सध्याच्या काळात माणसाची जीवनशैली खूप धावपळीची नि धकाधकीची झाली आहे. वेळी-अवेळी अरबट-चरबट खाणं आणि तेही घाईघाईत, दिवसभर धावपळ-दगदग आणि व्यायाम कमी किंवा नाहीच, अपुरी झोप आणि या सगळ्याच्या जोडीला मानसिक ताण. या सगळ्यामुळे साहजिकच वेगवेगळ्या व्याधी शरीरात घर करून राहतात.
त्यात प्रामुख्याने लठ्ठपणा, डायबेटीस, ब्लड प्रेशर, हृदयरोग अशा वेगवेगळ्या गंभीर आजारांचा समावेश असतो. शरीरातल्या महत्त्वाच्या अवयवांची दुखणी ओढवली की माणूस कमकुवत होतो. त्यामुळे जीवनशैली सुधारणं आणि त्यात सातत्य राखणं सर्वांत महत्त्वाचं आहे. तरीही हृदयरोगाची स्थिती आधीच उत्पन्न झाली असेल, तर तिचं निदान वेळीच होणं गरजेचं आहे. निदान वेळेत झालं, तर त्यावर योग्य उपचार करून आयुर्मान वाढवता येऊ शकतं. हे निदान करण्यासाठी ट्रोपॉनिन टी टेस्ट महत्त्वाची ठरते. 'झी न्यूज हिंदी'ने याबद्दल अधिक माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
कोलेस्टेरॉल वाढलं तर हाय ब्लड प्रेशरचा त्रास होतो. त्यामुळे हार्ट अॅटॅक, कोरोनरी आर्टरी डिसीज, ट्रिपल व्हेसल डिसीज आदी आजार होऊ शकतात. रक्ताची ट्रोपॉनिन टी टेस्ट केली, तर या हृदयविकारांचं निदान वेळीच होऊ शकतं. या टेस्टच्या साह्याने रक्तात ट्रोपॉनिन नावाच्या प्रोटीनची पातळी किती आहे, हे कळतं. त्या प्रोटीनची पातळी वाढली, तर हृदयाचे स्नायू कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे ट्रोपॉनिन टी टेस्टमधून या प्रोटीनची पातळी आपल्याला समजू शकते. त्यावरून योग्य ते निदान करता येतं.
ट्रोपॉनिन टी टेस्ट ही रक्ताची चाचणी आहे. त्यातून शरीरातल्या सोडियम, क्रिएटिनिन आणि पोटॅशियम या घटकांची पातळी किती आहे हे कळतं. यापैकी कोणत्याही घटकाची पातळी वाढली, तर ते हार्ट अॅटॅकचं कारण बनू शकतं. या टेस्टसाठी हाताच्या शिरेत सुई घालून रक्ताचा नमुना घेतला जातो. या टेस्टचा वापर जगभर केला जातो. कारण हृदयविकारासारख्या गंभीर आजाराची संभाव्य शक्यता वेळीच कळण्यास त्यामुळे मदत होते.
छातीत सतत दुखत असेल, गळ्यात सतत वेदना होत असतील, जबडा दुखत असेल, बेचैनी असेल, प्रमाणापेक्षा जास्त घाम येत असेल, उलट्या होत असतील किंवा खूपच जास्त थकल्यासारखं वाटत असेल, तर ट्रोपॉनिन टी टेस्ट जरूर करून घ्यावी. कारण ही लक्षणं दुर्लक्ष करण्यासारखी नाहीत. टेस्ट केली आणि त्यातून वेळीच निदान झालं तर योग्य उपचार करून आयुर्मान वाढवता येऊ शकतं.