सर्वसाधारणपणे कमी-जास्त प्रमाणात ४५ टक्के लोक घोरतात. घोरण्यामुळे आपली झोप नीट होत नाही; शिवाय अनारोग्यालाही आमंत्रण मिळतं. आपल्या घोरण्यामुळे इतरांना त्रास होतो, ही गोष्ट वेगळीच. घोरण्याचा त्रास टाळण्यासाठी आपल्या मनानं स्प्रे किंवा औषधं घेण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला नेहेमी महत्त्वाचा. तुम्हालाही सौम्य प्रमाणात घोरण्याची सवय असेल तर काही नैसर्गिक उपायांनी तुम्ही तुमचं घोरणं कमी करू शकता. तरीही फरक पडला नाही, तर मात्र डॉक्टरांकडे जाणं हाच शेवटचा पर्याय.
- १) झोपेची स्थिती बदला : पाठीवर झोपल्यास झोपेच्या वेळी घशातून कंपन करणारा आवाज येऊ शकतो. कुशीवर झोपल्यास तुमचं घोरणं कमी होईल. कुशीवर झोपणं शक्य होत नसल्यास झोपताना पाठीखाली टेनिस बॉल ठेवून पाहा. हा बॉल पाठीला टोचल्यानं तुम्ही आपोआपच कुशीवर वळाल. या सोप्या उपायानंही घोरणं बरंच कमी होऊ शकतं.
- २) वजन कमी करणं : वजन कमी केल्यामुळे काही वेळा घोरणं कमी होऊ शकतं. बारीक लोकही घोरतात; पण सडसडीत असताना तुम्ही घोरत नसाल आणि वजन वाढल्यावर तुम्ही घोरायला लागला असाल, तर वजन कमी करण्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.
- ३) मद्यपान टाळा : मद्यपान आणि वेदनाशामक औषधांमुळे आपल्या घशाच्या मागील बाजूचे स्नायू शिथिल होतात. श्वसन मार्गावर त्याचा दाब पडतो. त्यामुळे घोरण्याचं प्रमाण वाढू शकतं. झोपण्याच्या चार ते पाच तास आधी तुम्ही मद्यपान केलं असेल, तर त्यामुळेही घोरणं वाढतं.
- ४) झोपेची शिस्त सांभाळा : दिवसभर काहीही विश्रांती न घेता खूप कष्टाचं काम करून रात्री झोपेपर्यंत आपण खूपच थकलेलो असतो. त्यामुळे आपोआप घोरणं वाढतं. जागरणासारख्या सवयीही टाळा.
- ५) नाक चाेंदलेलं नसावं : नाक चोंदलेलं असलं तर घोरण्याची शक्यता वाढते. झोपण्यापूर्वी नाक स्वच्छ करणं किंवा गरम पाण्यानं शॉवर घेतल्यास घोरण्याची समस्या कमी होऊ शकते.
- ६) उशी बदला : अनेकदा उशी स्वच्छ नसते. त्यामुळे ॲलर्जिक रिॲक्शनची शक्यता निर्माण होते. त्यानं घोरणं वाढू शकतं.
- ७) पाणी प्या : पाणी कमी प्यायल्यास नाकातील स्राव अधिक चिकट होतो आणि घोरण्याची समस्या वाढू शकते.