धकाधकीच्या जीवनात व्यायाम आणि संतुलित आहार याकडे लक्ष देणं शक्य होत नाही. परिणामी त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. सध्या अनेकांना कामांचा प्रचंड ताण असतो. त्यामुळे ऑफिसमध्ये अनेक तास एकाच ठिकाणी बसून राहावं लागतं आणि पायांवर सूज येण्याची समस्या निर्माण होते. घरगुती उपाय करून त्यावर मात करता येणं शक्य आहे. ‘झी न्यूज हिंदी’नं या संदर्भात माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
तुम्ही जिथे काम करता तिथल्या कामाच्या पद्धतीचा अवलंब केल्याशिवाय पर्याय नसतो. एकाच जागी अनेक तास बसून काम करण्याची जणू कर्मचाऱ्यांना सवयच झालेली असते. यामुळे अनेकांचे पाय सुजतात. सुरुवातीला ही बाब किरकोळ वाटत असली तरी भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. या समस्येवर अनेक घरगुती उपाय आहेत. त्यांचा अवलंब केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. एकाच जागी बसून पायावर सूज आली तर सोपा आणि साधा उपाय म्हणजे बर्फाचे तुकडे (Ice Pack) घेऊन जिथे सूज आहे त्या जागी हलक्या हाताने मसाज करावा. काही वेळानंतर आराम मिळत असल्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. याद्वारे पायावरची सूज कमी होऊ शकते.
खाण्याचा सोडापायावरची सूज घालवण्यासाठी खायच्या सोड्याचाही (Baking Soda) वापर केला जाऊ शकतो. दोन चमचे तांदूळ घेऊन ते पाण्यात उकळून घ्यावेत. त्या पाण्यात दोन चमचा खायचा सोडा टाकून त्याची पेस्ट तयार करावी. ती पेस्ट दुखत असलेल्या ठिकाणी 15 मिनिटांपर्यंत लावावी. या उपायामुळे रक्ताभिसरण क्रिया (Blood Circulation) चांगली राहते आणि सूज कमी होऊन दिलासा मिळू शकतो.
हळदीची पेस्टमार लागल्यानंतर रक्तस्राव थांबवण्यासाठी बऱ्याचदा जखम झालेल्या ठिकाणी हळद लावली जाते. हळद अनेक बाबतीत गुणकारी आहे. त्याप्रमाणे पाय सुजले असल्यासही हळद उपयोगी ठरू शकते. पायावरची सूज कमी करण्यासाठी एक चमचा हळद घेऊन त्यात एक चमचा खोबरेल तेल घालून त्याची पेस्ट तयार करावी. सूज असलेल्या जागी ती पेस्ट लावावी आणि ती पेस्ट पूर्णपणे वाळल्यानंतर कोमट पाण्याने ते धुऊन टाकावं. यामुळे तुम्हाला आराम मिळू शकेल.
शेंदेलोण (सैंधव)पायावरची सूज कमी करण्यासाठी शेंदेलोण (सैंधव) अत्यंत फायदेशीर ठरू शकतं. अगदी पूर्वापार शेंदेलोणचा वापर केला जात आहे. स्वयंपाकासाठी वापरलं जाणारं सैंधव पायाची सूज कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरू शकतं. कोमट पाण्यात थोडं सैंधव घालावं व पाय त्या पाण्यात बुडवून ठेवावेत. यामुळे सूज कमी होऊन आराम मिळेल.
मसाजएकाच जागी बसून पायांवर सूज येणे ही समस्यांना अनेकांना भेडसावते. यावर मसाज उपयुक्त ठरतो. व्हर्जिन कोकोनट ऑइल थोडं गरम करावं. या तेलात काही लसूण पाकळ्या घालाव्यात. तेलात लसूण टाकून तयार झालेलं तेल घेऊन 5 मिनिटांपर्यंत पायांवर मसाज करावा. काही दिवसांतच त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.
दरम्यान, ऑफिसमध्ये गेल्यानंतर अनेक तास एकाच ठिकाणी बसून काम केल्याशिवाय गत्यंतर नसते. परंतु, थोड्या थोड्या वेळाने जागेवरून उठून फेरफटका मारायला हवा. यामुळे शरीरातली रक्ताभिसरण क्रिया योग्य राहते आणि भविष्यात आरोग्याच्या समस्याही उद्भवत नाहीत.