(Image Credit : airsideandy.com)
टेक्नॉलॉजीच्या विकासामुळे गोष्टी जितक्या सोप्या झाल्या आहेत, तितक्याच याने समस्याही वाढल्या आहेत. त्यात खासकरुन सर्वात जास्त समस्या होताहेत, त्या टीव्ही आणि मोबाईल स्क्रीनमुळे. बदलत्या लाईफस्टाइलमध्ये टीव्ही आणि मोबाइल हे व्यक्तीच्या आयुष्याचे महत्वपूर्ण भाग झाले आहेत. पण यामुळे मोठ्यांसोबतच लहान मुलांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होत आहेत. म्हणजे सतत टीव्ही बघणे आणि मोबाइलवर खेळणे लहान मुला-मुलींच्या मेंदूला नुकसान पोहोचवू शकतं. ही बाब नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ व्दारे फंडेड साधारण ३०० मिलियन डॉलर म्हणजेच २१ अरब रुपये खर्च करुन होत असलेल्या एका अभ्यासातून समोर आली आहे.
या अभ्यासाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या अभ्यासांतर्गत अभ्यासक ९ ते १० वयोगटातील साधारण ११ हजार लहान मुला-मुलींवर जवळपास १० वर्षे अभ्यास केला जाणार आहे. बालपणीचे अनुभव लहान मुला-मुलींच्या भावनिक आणि बौद्धिक आरोग्यवर कसा प्रभाव करतात हे जाणून घेतले जाणार आहे. या अभ्यासाशी संबंधित सुरुवातीच्या डेटामधून हे समोर आले आहे की, टेक स्क्रीन तरुणांईमध्ये बदल आणत आहे आणि हा बदल चांगला नाहीये.
४ हजार ५०० लहान मुला-मुलींच्या मेंदूच्या स्कॅन्समध्ये आढळले की, सात तासांपेक्षा जास्त टीव्ही, मोबाइल इत्यादी सारख्या टेक स्क्रीन्स बघत राहिल्याने त्यांच्या ब्रेन कॉर्टेक्स(मेंदूचा बाहेरील भाग) पातळ होत आहेत. मेंदूचं हे बाहेरील आवरण फिजिकल वर्ल्डशी संबंधित माहितीची प्रक्रिया करण्यात मदत करते. एनआईएच अभ्यासाचे निर्देशक गया डाउलिंग या रिपोर्टच्या आधारावर सांगितले की, 'सध्याच हे स्पष्ट झालं नाही की, हा बदल केवळ स्क्रीनमुळे होतोय किंवा नाही. तसेच या स्क्रीनमुळे होणारा हा बदल किती वाईट आहे. हे सुद्धा स्पष्ट झालेलं नाही'.
अॅडलेसंट ब्रेन कॉग्निटीव डेवलपमेंट (ABCD) नावाच्या सुरुवातीच्या अभ्यासानुसार, जी लहान मुलं-मुली रोज टेक स्क्रीनच्या साधारण २ तास संपर्कात राहतात. त्यांना विचार आणि भाषासंबंधी टेस्टमध्ये दुसऱ्या मुला-मुलींच्या तुलनेत कमी गुण मिळाले आहेत. यावरुनही अनेक अंदाज बांधले जात आहेत. या अभ्यासासंबंधी मुख्य डेटा २०१९ च्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
टेक्नॉलॉजी आजच्या लाइफस्टाइलमध्ये गरजेची असली तरी त्याचा किती प्रमाणात वापर करावा, हे पूर्णपणे व्यक्तिंवर अवलंबून आहे. कामासाठी किंवा मनोरंजनासाठी काही वेळ या गोष्टींचा वापर करणे गरजेचे आहे. पण सतत गोष्टींना चिकटून बसणे हे लहानांसोबतच मोठ्यांसाठीही नुकसानकारक आहे. त्यामुळे काही नियम स्वत: तयार केले आणि ते फॉलो केले तर या गोष्टींची सवय लागणार नाही. याचा फायदा म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं राहिल आणि लहान मुलांच्या मेंदूचा व्यवस्थित विकास होण्यास मदत होईल.