ऑलिम्पिक्स, कॉमनवेल्थ गेम्स आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारतासाठी पदकांची कमाई करणारी सुपर मॉम मेरी कोमने बॉक्सिंगच्या वेगवेगळ्या आव्हानांसोबतच वजन कमी करण्यासाठीचे आव्हानही तितक्याच ताकदीने पेलवलं आहे. मेरीने फक्त अवघ्या चार तासांमध्ये वजन कमी करण्याची किमया केली आहे. तिने फक्त चार तासांमध्ये दोन किलोपर्यंत वजन कमी केलं होतं. आता तुमच्या मनात अनेक प्रश्नांनी गोंधळ घातला असेल, मेरीने असं का केलं? आणि खरचं चार तासांमध्ये दोन किलो वजन कमी करणं कसं शक्य आहे? यांसारख्या अनेक प्रश्नांनी डोकं भंडावून सोडलं असेल ना? थांबा शांत व्हा. आम्ही तुम्हाला सांगतो मेरने नक्की काय केलं आणि कशासाठी केलं...
पोलंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 13व्या सिलेसियन बॉक्सिंग टूर्नामेंटमध्ये मेरी कॉमला 48 किलो कॅटेगरीमध्ये भाग घ्यायचा होता. परंतु तिचं वजन त्या कॅटेगरीमध्ये भाग घेण्यासाठी दोन किलोपेक्षा जास्त होतं. टूर्नामेंट सुरू होण्यासाठी अवघे चार तास शिल्लक होते. अशातच मेरीपुढे मोठं प्रश्नचिन्ह होतं. तिने मनाशी निश्चय पक्का केला आणि अवघ्या चार तासांमध्ये फक्त वजनच कमी केलं नाही तर त्या टूर्नामेंटमध्ये सहभागी होऊन त्यामध्ये गोल्ड मेडलही आपल्या नावे केलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेरीने फक्त स्किपिंग करून हे वजन कमी केलं आहे. ती जवळपास एक तासापर्यंत स्किपिंग करत होती.
स्किपिंग करताना पायांपासून डोक्यापर्यंत शरीराच्या सर्व अवयवांची मूव्हमेंट होते. रश्शी उड्या म्हणजेच स्किपिंग करणं ही एक रोप कार्डियो एक्सरसाइज आहे आणि जर तुम्हीही दररोज 15 मिनिटांसाठी स्किपिंग केलं तर ते आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं.
15 मिनिटांमध्ये 200 कॅलरी करा बर्न
15 मिनिटांसाठी स्किपिंग केल्यामुळे 200 कॅलरी खर्च केल्या जाऊ शकतात. यामुळेच स्किपिंग करून लगेच वजन कमी करण्यात येतं. खास गोष्ट म्हणजे दररोज अर्धा तासामध्ये स्किपिंग केल्यामुळे महिन्याभरात पाच किलो वजन कमी करणं शक्य होतं.
स्किपिंग केल्यामुळे फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. कारण जेव्हा आपण स्किपिंग करतो त्यावेळी धाप लागते आणि श्वास जोरात घेण्यात येतो. यामुळे लांब श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा क्रम वाढतो. त्यामुळे फुफ्फुसांचा व्यायाम होतो. स्किपिंग केल्यामुळे खूप घाम येतो त्यामुळे त्वचेची रोमछिद्र मोकळी होतात आणि त्वचेला श्वास घेणं शक्य होतं. त्याचबरोबर त्वचेवरील अॅक्ने आणि डाग दूर होतात.
या गोष्टी लक्षात घ्या
स्किपिंग करण्याआधी वॉर्मअप करणं गरजेचं असतं. स्किपिंग नेहमी अनोशापोटी करा त्याचप्रमाणे त्यावेळी कपडे सैल आणि आरामदायी परिधान करा. स्किपिंगची सुरुवात 10 मिनिटांपासून सुरू करून साधारणतः एक तासांपर्यंत करा. त्यानतर आपल्या क्षमतेनुसार स्किपिंग करा. नेहमी शूज घालूनच स्किपिंग करा. तसेच स्किपिंग करण्यासाठी माती असलेल्या जागेची निवड करा.
स्किपिंग करताना उड्या कमी उंचीवर मारा. ज्यास्त मोठ्या उंचीवर उड्या मारल्याने त्याचा गुडघ्यांवर परिणाम होऊ शकतो. जर तुमचं वजन कमी असेल तर आधी दुसऱ्या एक्सरसाइज करून वजन कमी करून घ्या. जेव्हा शरीर फ्लेक्सिबल होईल त्यानंतरच स्किपिंग करा.