लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दोनतृतीयांश मुलांना जन्मत: किडनी, मूत्रमार्गाची विकृती आदी विकार असतात. या विकारांमध्ये प्रामुख्याने मूत्रमार्गात अडथळा (ऑब्स्ट्रक्टिव्ह नेफ्रोपॅथी) व उलट दिशेने मूत्रप्रवाह (रिफ्लेक्स नेफ्रोपॅथी) यांचा समावेश असतो, अशी माहिती मूत्रपिंड विकार तज्ज्ञांनी दिली.
जगभरात १० मार्च हा दिवस जागतिक मूत्रपिंड दिवस म्हणून पाळला जातो. ‘किडनी हेल्थ फॉर ऑल’ हे या वर्षाचे घोषवाक्य आहे. याबाबत मूत्रपिंड विकारतज्ज्ञ डॉ. रमेश सोहोनी यांनी सांगितले की, लहान मुलांचे मूत्रपिंड विकसित अवस्थेत असते. त्यामुळे त्यांच्या विकारांकडे दुर्लक्ष केल्यास आजीवन डायलेलिस, किडनी प्रत्यारोपण, उच्च रक्तदाब, मल्टिऑरगन फेल्युअर, ॲनिमियासारख्या विकारांचा सामना करावा लागतो. मात्र, वेळेत निदान आणि योग्य उपचार केल्याने दीर्घकालीन मूत्रमार्गाच्या विकारांपासून वाचविता येते. काही आजार जन्मजात दोषांमुळे होतात, तर बरेचसे आजार विविध कारणांमुळे होऊ शकतात. मूत्रपिंडामध्ये छोट्या फुग्यासारखा पिशव्या म्हणजे मल्टिपल सिस्टस तयार होणे, अशा अनेक प्रकारचे मूत्रपिंड आणि मूत्रमार्ग यात दोष आढळतात. यापैकी शस्त्रक्रियेने काही दोष दूर करता येतात. तर, काहींमुळे मूत्रपिंडाचे कार्य मंदावते, असे म्हणाले.
लक्षणे दिसताच उपाययोजना करणे आवश्यक nमूत्रपिंड व मूत्रमार्गात जंतू संसर्गामुळे होणाऱ्या रोगांचे प्रमाण जास्त आहे. विशेषत: स्त्रियांमध्ये योनीमार्ग, मूत्रमार्ग आणि शौचमार्ग एकमेकांच्या जवळ असल्यामुळे मूत्राशयाच्या आणि खालील मूत्रमार्गाच्या अर्थात आजारांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत जास्त आढळते. nमूत्रमार्ग आणि शौच मार्गाची स्वच्छता राखणे, हवामानाला अनुसरून योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन करणे, जास्त वेळ लघवी थांबवून न ठेवता लघवीचा निचरा करणे, काही लक्षणे दिसल्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे.