नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या विरोधात देशभरात लसीकरण मोहीम सुरू असून आतापर्यंत लसीचे 197 कोटी डोस देण्यात आले आहेत. यानंतर आता सर्व्हायकल कॅन्सर आणि टायफॉइड (Cervical Cancer and Typhoid and) विरुद्ध लसीकरण मोहीम लवकरच सुरू केली जाऊ शकते. सरकारी सल्लागार समूह एनटीएजीआयने (NTAGI) डेटा तपासल्यानंतर सर्व्हायकल कॅन्सर आणि टायफॉइड विरोधात लसीकरणाची शिफारस केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जून रोजी सर्व्हायकल कॅन्सर आणि टायफॉइड विरुद्ध लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समूहाच्या (NTAGI) एका वेगळ्या एचपीव्ही कार्य गटाने राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्यासाठी क्लिनिकल चाचण्यांचा डेटा आणि लस यांचा आढावा घेतला होता. तर अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या विषय तज्ज्ञ समितीने 15 जून रोजी लसीसाठी विपणन मंजुरीची शिफारस केली होती. मात्र, ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) च्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.
सूत्रांनी सांगितले की, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे गव्हर्नमेंट अँड रेग्युलेटरी अफेअर्सचे संचालक प्रकाश कुमार सिंग यांनी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडे अर्ज केला आहे आणि डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजीच्या मदतीने फेज 2/3 क्लिनिकल चाचणी पूर्ण झाल्यानंतर देशात याची लवकर उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी लसीसाठी विपणनची परवानगी मागितली आहे.
प्रकाश कुमार सिंग यांनी सादर केलेल्या अर्जानुसार, सीईआरव्हीएव्हीएसी या लसीने मजबूत अँटीबॉडी प्रतिसाद दर्शविला आहे, जो सर्व लक्ष्यित एचपीव्ही प्रकारांसाठी आणि सर्व डोस आणि वयोगटांसाठी अंदाजे 1,000 पट जास्त आहे. तसेच, अर्जात असे म्हटले आहे की, देशात दरवर्षी लाखो महिलांना सर्व्हायकल आणि इतर काही प्रकारच्या कॅन्सरचे निदान होते. एवढेच नाही तर पीडितांचे मृत्यूचे प्रमाणही खूप जास्त आहे. सर्व्हायकल कॅन्सर हा भारतातील 15 ते 44 वयोगटातील महिलांमध्ये दुसरा सर्वात सामान्य कॅन्सर आहे.