कोरोनाने पुन्हा एकदा जगात थैमान घालायला सुरुवात केली आहे. यावेळी ओमायक्रॉन व्हेरिएंटची अनेक प्रकरणं समोर येतायत. दरम्यान, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने देखील ओमायक्रॉनबाबत इशारा दिला आहे. अशात अमेरिकेतंही कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. मुख्य म्हणजे अमेरिकेत बूस्टर डोस देण्यात सुरुवात झाल्यानंतरही रूग्णसंख्या वाढताना दिसतेय.
अमेरिकेत एकाच दिवसात कोरोनाचे 5 लाख 80 हजार नवे रुग्ण सापडले आहेत. तिथे एकाच दिवसात आढळलेली नव्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. कोरोनाची बाधा झालेल्या लहान मुलांना रुग्णालयात दाखल करण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. ब्रिटन, युरोपातील देश, ऑस्ट्रेलिया अशा अनेक ठिकाणी ओमायक्रॉनच्या प्रसारामुळे कोरोना साथीचा धोका आणखी वाढला आहे.
कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जगभरातील रुग्णसंख्येने तब्बल 28 कोटींचा टप्पा पार केला आहे. भारतातही कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होत आहे. वेगाने वाढणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 27 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील दिवसागणिक वाढ होत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.