- मयूर पठाडेसोशल मिडीयाच्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही आहात? फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, स्रॅपचॅट, यूट्यूब? कदाचित सगळ्याच प्लॅटफॉर्मवर तुम्ही असाल? पण यातल्या कुठल्या प्लॅटफॉर्मचा तुम्ही जास्त वापर करता?रोज दोन तासापेक्षा जास्त वेळ तुम्ही सोशल मिडीयावर घालवत असाल, तर ते तुमच्या मानसिक आरोग्यासाठी घातक आहेच, पण इन्स्टाग्राम हे तरुणांच्या त्यातही तरुणींच्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. नुकत्याच झालेल्या नव्या अभ्यासाचा हा निष्कर्ष आहे. इंग्लंडच्या ‘रॉयल सोसायटी फॉर पब्लिक हेल्थ’ या सोसायटीने १४ ते २३ वयोगटातील मुलामलींच्या सोशल नेटवर्किंग सवयींचा अभ्यास केला. त्यांच्यातली चिंता, नैराश्य आणि स्वशरीराविषयी त्यांची प्रतिमा.. अशा अनेक गोष्टींचा त्यात बारकाईनं अभ्यास करण्यात आला. इन्स्टाग्राम सर्वात घातक,तर युट्यूब सकारात्मक
इन्स्टाग्राममध्ये तुमचे फोटो एडिट, फिल्टर करण्याची आणि आपण आहोत, त्यापेक्षा अधिक सुंदर करून पाठवण्याची सोय असल्याने त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे जे तरुण, विशेषत: तरुणी इन्स्टाग्रामवरचे हे अनरिअलिस्टिक, ‘खोटे’, ‘नकली’ फोटो पाहतात, तेव्हा त्यांना स्वत:च्या बॉडी आणि शरीराविषयी खूपच गिल्ट वाटायला लागतो. आपण दिसायला कुरूप आहोत, इतर तरुणी मात्र आपल्या तुलनेत खूपच सुंदर आहेत अशी नकारात्मक मानसिकता त्यांच्या मनात तयार होते. त्यामुळे त्यांच्यात नैराश्य येऊ शकतं. इन्स्टाग्राममुळे आपल्याच शरीराविषयी आपल्या मनात नकारात्मक भावना तयार होते, आपल्या झोपेचा पॅटर्न बिघडतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला सेन्स आॅफ ‘फोमो’ (फिअर आॅफ मिसिंग आऊट’ वाढीला लागतो...त्यामुळे संशोधकांनी इशारा दिला आहे की, इन्स्टाग्रामच्या अति वापरापासून दूर राहा, वस्तुस्थिती समजून घ्या आणि नकारात्मक मानसिकतेला बळी पडू नका. संशोधक म्हणतात, त्यासाठी इन्स्टाग्रामवरील ‘फोटोशॉप’ किंवा फिल्टरवर बंदी आणावी असं आमचं म्हणणं नाही, पण हे फोटो खरे नाहीत, हे लोकांना कळावं यासाठी निदान त्यांना सजग तरी करायला हवं.