ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयने दोन कोरोना प्रतिबंधात्मक लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत डीसीजीआयने ही माहिती दिली. डीसीजीआयचे संचालक व्हीजी सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना भारतानंच्या या निर्णयाबाबत आपलं मत मांडलं आहे.
भारताने घेतलेल्या या निर्णयाचे जागतिक आरोग्य संघटनेनं स्वागत केलं आहे. भारतानं हे मोठं पाऊल उचलल्यामुळे कोरोनाच्या लढाईत यश मिळणार असल्याची प्रतिक्रिया WHO नं दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञ डॉ. पूनम खेत्रपाल सिंग यांनी याबाबबत माहिती दिली आहे. पूनम खेत्रपाल सिंग WHO च्या दक्षिण आशियाई विभागाच्या प्रमुख आहेत.
दरम्यान, आता या दोन्ही लसींच्या निर्धारित आपत्कालीन वापराला परवानगी मिळताच भारतात तातडीने कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यातल जवळपास 30 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. पहिल्या टप्प्यातील नागरिकांना ही लस मोफत देण्याबाबत केंद्र सरकार सहमत असल्याने त्यापैकी 3 कोटी लोकांना मोफत लस देण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी माहिती दिली आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सचा समावेश आहे. त्यानंतर 50 पेक्षा जास्त वयाच्या आणि इतर आजार असलेल्या 27 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे.
कोविशिल्डला मिळालेल्या परवानगीनंतर अदर पुनावाला यांनी व्यक्त केला आनंद
सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी ट्वीट करत आपला आनंद व्यक्त केला. "नव्या वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. लस संकलनासाठी सीरम इन्स्टिट्यूटनं पत्करलेल्या सर्व जोखीमांनांतर अखेर यश मिळालं. करोनावर मात करणारी कोविशिल्ड ही पहिली लस असून तिच्या वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. ही लस सुरक्षित आणि परिणामकारक असून पुढील आठवड्यापासून ती देण्यास तयार आहे," असं ट्वीट अदर पुनावाला यांनी केलं.
या ट्वीटसोबतच अदर पुनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, बिल गेट्स, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, आयसीएमआर, ऑक्सफर्डसह अनेकांचे आभार मानले.