- अमृता कदम
परदेशी फिरायला जायचं म्हटलं की अनेक जणांना पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे तिथलं खाणं-पिणं आपल्याला झेपेल का? जर तुम्ही पक्के शाकाहारी असाल तर मेन्यू कार्डमधले अनेक आॅप्शन्स तुमच्यासाठी बाद होतात. मग तुम्हाला भारतीय जेवण देणारी रेस्टॉरण्ट शोधण्याशिवाय काही पर्याय राहात नाही. पण शाकाहारी जेवणात अनेक पर्याय उपलब्ध करून देणारे देश असतील तर मग शाकाहरी पर्यटकांनाही असे देश प्रिय असतात. आणि म्हणूनच दुबई,इंग्लड आणि सिंगापूर हे देश अनेक भारतीयांच्या पसंतीस उतरले आहेत.
पर्यटन क्षेत्रातली अग्रणी संस्था असलेल्या ‘कॉक्स अँड किंग्ज’नं 20 ते 65 वयोगटातील प्रवाशांचं एक सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणाचं नावच मुळी ‘शाकाहारींची पसंती असलेली प्रमुख ठिकाणं आणि परदेशी प्रवास करणाऱ्या शाकाहारी भारतीयांचा प्राधान्यक्र म’ असं होतं. जानेवारी 2017 ते मार्च 2017 या काळात परदेशी प्रवास केलेल्या भारतीयांची मतं या सर्वेक्षणात विचारात घेतली गेली. मलेशिया, स्वित्झर्लंड, थायलंड आणि आॅस्ट्रेलियालाही अनेक भारतीय प्रवाशांनी आपली पसंती दिली आहे. भारतातून प्रवासासाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्या तसंच या देशांमध्ये स्थायिक होणाऱ्या भारतीयांची संख्या यामुळे या देशांत भारतीय पद्धतीचं जेवण देणाऱ्या रेस्टॉरण्टची संख्या वाढत आहे.
या सर्वेक्षणातून अजून एक बाब स्पष्ट झाली ती म्हणजे प्रवासासाठी एखादं ठिकाण निश्चित करताना तिथे मिळणारे खाद्यपदार्थही महत्त्वाची भूमिका बजावतात. 70 टक्के शाकाहारी मंडळी त्यांना सोयीचं असं जेवण मिळेल याची खात्री करूनच फिरण्यासाठीचं ठिकाण निश्चित करतात. तर 30 टक्के मंडळीही प्रवासाला जायचं निश्चित झालं की सगळ्यात आधी तिथली भारतीय पद्धतीचं जेवण देणारी ठिकाणं शोधायला बसतात.
वय हा घटकही प्रवाशांचा प्राधान्यक्र म ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. म्हणजे तरूण जे 20 ते45 वर्षे वयाच्या दरम्यान आहेत, ते कॉस्मोपॉलिटन टूरला प्राधान्य देतात अर्थात शाकाहारी जेवणाची सोय असेल तरच. पण पंचेचाळीसच्या पुढचं आणि 65 वर्षापर्यंतचे प्रवासी शाकाहारी जेवणाची खात्री देणाऱ्या ग्रूप टूर्सनाच पसंती देतात.
शाकाहारी जेवणाची सोय असलेले रेस्टॉरण्ट असलेल्या हॉटेल्समध्ये राहायला 53 टक्के शाकाहारी भारतीय प्रवासी उत्सुक असतात. शाकाहारी भारतीयांपैकी अवघे 20 टक्के भारतीयच मल्टी-क्युझिन रेस्टॉरण्ट असलेल्या हॉटेल्सना पसंती देतात. कॉक्स अँड किंग्जचे प्रमुख करन आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तामीळनाडूमधले प्रवासी प्रामुख्यानं शाकाहारी जेवणाची मागणी करतात. त्याचबरोबर 77 टक्के शाकाहारी भारतीय लांबच्या प्रवासाला निघताना खबरदारी म्हणून स्वत:सोबत उपमा, नूडल्स असे रेडी-टू-कुक पदार्थही बाळगतात. पण जर पाच दिवसांपेक्षा मोठी टूर असेल तर मात्र शाकाहारी जेवणाचा पर्याय विचारात घेऊनच प्रवासी आपल्या प्रवासाचं ठिकाण ठरवतात.