आपल्या त्वचेला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नेहमीच सौंदर्यप्रसाधनांची आवश्यकता नसते तर त्यासाठी आपला आहारही महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी आपला आहार संतुलित असणे गरजेचे असते. संतुलित आहार म्हणजेच पौष्टिक पदार्थांनी युक्त असा आहार. जसे व्हिटॅमिन 'ए' आणि व्हिटॅमिन 'सी' त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त असते. हे दोन्ही व्हिटॅमिन्स फळं आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात असतात. तसे पाहता सगळेच व्हिटॅमिन शरिरासाठी उपयुक्त असतात. पण त्वचा सुदृढ ठेवण्यासाठी हे तितकेच महत्त्वाचे ठरतात. मुख्यतः तेलकट त्वचेसाठी व्हिटॅमिन्स फार गुणकारी ठरतात. अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्येही या व्हिटॅमिन्सचा समावेश करण्यात येतो. जाणून घेऊयात त्वेचेसाठी उपयुक्त ठरणाऱ्या व्हिटॅमिन्सबाबत...
व्हिटॅमिन 'ए'
यामध्ये मुबलक प्रमाणात अॅन्टीऑक्सीडेंटचे गुणधर्म आढळून येतात. याचा उपयोग प्रत्येक वयोगटातील स्त्रीयांच्या आरोग्यासाठी होतो. या व्हिटॅमिनमुळे शरिरातील हाडे, त्वचा आणि पेशींचे आरोग्य राखण्यासाठी होतो. व्हिटॅमिन 'ए' गाजर, पपई, टरबूज, टॉमेटो, ब्रोकली, अळू, पालक, अंडी, दुध आणि धान्यांमध्ये आढळून येते.
व्हिटॅमिन 'बी'
या व्हिटॅमिनचे दोन प्रकार आहेत. व्हिटॅमिन बी 1 आणि व्हिटॅमिन बी 3. हे दोन्ही त्वचेसाठी लाभदायक ठरतात. व्हिटॅमिन बी 1 मुळे शरिरामध्ये रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते. ज्यामुळे चेहऱ्यावर चमक येते. व्हिटॅमिन बी 3 मुळे अॅक्नेची समस्या दूर होते तसेच त्वचा तजेलदार होते. ब्रोकली, अंडी आणि खजूर यांमध्ये दोन्ही व्हिटॅमिन्स आढळून येतात. सुंदर त्वचेसाठी आहारात या व्हिटॅमिन्सचा समावेश करणे गरजेचे असते.
व्हिटॅमिन 'सी'
व्हिटॅमिन 'सी' त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. यामध्ये असणारे अॅन्टीऑक्सिडेंट त्वचेचे तारूण्य राखण्यास मदत करतात. हे कोलेजेन तयार करण्यासाठीही मदत करतात. आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते.
व्हिटॅमिन 'ई'
व्हिटॅमिन 'ई' त्वचेसोबतच संपूर्ण शरिरासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि वाढत्या वयाच्या खुणा मिटवण्याचे काम करते. बदाम, किवी, हिरव्या पालेभाज्या आणि धान्यांपासून मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन 'ई' मिळते.