शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी प्रोटीनसोबतच व्हिटॅमिन्सचीही आवश्यकता असते. व्हिटॅमिन्स अनेक प्रकारचे असून त्यांचे शरीराला अनेक फायदे होतात. यातील एखाद्या जरी व्हिटॅमिन्सची कमतरता असेल तर शरीराला अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. डायबिटीजमुळे शरीराच्या इतर अनेक अवयवांवर परिणाम होतो. डोळ्यांचे आरोग्य, हृदय रोग, किडनी फेल होणं यांसारख्या समस्या होऊ शकतात. अनेक संशोधनांतून सिद्ध झाल्यानुसार, काही निश्चित व्हिटॅमिन्सचा आपल्या आहारात समावेश केल्यामुळे मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते. जाणून घेऊयात अशा काही व्हिटॅमिन्यबाबत जे डायबिटीजच्या रूग्णांसाठी उपयुक्त ठरतात.
व्हिटॅमिन 'डी'
ऑस्ट्रेलियामध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनातून व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे डायबिटीजचा धोका वाढतो असं सिद्ध झालं आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे की, सूर्यप्रकाश म्हणजे व्हिटॅमिन डीचा सर्वात मोठा स्त्रोत समजला जातो. याच्या कमतरतेमुळे लाखो लोकं टाइप-2 डायबिटीजची शिकार होतात. संशोधनातून असं समोर आलं आहे की, अशा व्यक्ती ज्यांच्यामध्ये व्हिटॅमिन डीची मुबलक प्रमाणात आढळतं त्यांना डायबिटीज होण्याचा धोका फार कमी असतो. रक्तामध्ये व्हिटॅमिन-डीचे अतिरिक्त 25 नॅनोमोल्स असल्यामुळे डायबिटीजचा धोका 24 टक्क्यांनी कमी होतो. अशा व्यक्ती ज्यांच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन-डीच्या नॅनोमोल्सची संख्या प्रति लीटर 50 पेक्षा कमी असते. त्यामध्ये व्हिटॅंमिन-डीची कमतरता आढळून येते. अशा व्यक्तींना डायबिटीज होण्याचा धोका असतो.
व्हिटॅमिन 'ई'
मधुमेह असलेल्या व्यक्तींना व्हिटॅमिन ईचे सेवन करणं फायदेशीर ठरतं, कारण शरीरामधील इन्सुलिनचे प्रमाण वाढवण्यासाठी हे फायदेशीर ठरतं. इन्सुलिन साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं. व्हिटॅमिन ईचे सेवन केल्यामुळे डायबिटीजचा धोका कमी होतो. साधारणतः मधुमेहींना हृदयाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु व्हिटॅमिन ईचे सेवन केल्यामुळे यापासून बचाव करणं सहज शक्य होतं. गहू, चणे, खजूर, क्रिम, बटर, स्प्राउट आणि फळं यांमध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळून येते.
व्हिटॅमिन 'सी'
व्हिटॅमिन ई प्रमाणेच व्हिटॅमिन सी शरीरातील इंसुलिनचे प्रमाण वाढविण्यासाठी मदत करतात. व्हिटॅमिन-सी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर शरीरातील प्रत्येक अवयवांना इन्सुलिन पुरविण्याचे काम करते. यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. आवळा, संत्री, कीवीचे सेवन केल्यामुळे शरीराला व्हिटॅमिन-सी मिळण्यास मदत होते.
व्हिटॅमिन 'के'
जर तुम्ही जेवणामध्ये व्हिटॅमिन केचा समावेश करत असाल तर तुम्हाला डायबिटीज होण्याचा धोका कमी असतो. व्हिटॅमिन के फॅट्समध्ये विरघळते. तसेच ते शरीरातील रक्त जमा होण्यापासून रोखतात. व्हिटॅमिन के घेतल्यामुळे शरीराला अन्सुलिन तयार करण्याच्या प्रक्रियेत मदत मिळते. तसेच रक्तातील ग्युकोजची पातळी ठिक करण्यासाठी मदत करते. त्यामुळे तुम्हाला आहारामध्ये व्हिटॅमिन केचे प्रमाण संतुलित असणं गरजेचं असतं. त्यासाठी आहारामध्ये ब्रोकली, पालक यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणं फायदेशीर ठरतं.