नवी दिल्ली - सर्व काही अपेक्षेप्रमाणे राहिल्यास, देशात 10 दिवसांच्या आत कोरोना लशीच्या लसीकरण अभियानाला सुरुवात होऊ शकते. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या कोविड-19 वरील तज्ज्ञांच्या समितीने (SEC) शुक्रवारी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशील्ड लशीला इमर्जन्सी वापरासाठी परवानगी देण्याची शिफारस करताच, देशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे आता भारतात लवकरच कोरोना लस उपलब्ध होईल, आशी आशा व्यक्त केली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, SECने या लशीच्या इमर्जन्सी वापरासाठी काही अटीच्या आधारे परवानगी दिली आहे. मात्र, अंतिम निर्णय ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (DCGI) घ्यायचा आहे. हा निर्णय केव्हाही घेतला जाऊ शकतो.
केव्हापर्यंत सुरू होणार लसीकरण अभियान -वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर लसीकरणाची प्रक्रिया 7 ते 10 दिवसांच्या आत सुरू होऊ शकते. इंग्लंडच्या मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीने (MHRA), ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधील वैज्ञानिकांनी विकसित केलेली तथा एस्ट्रेजेनेकाने तयार केलेल्या लशीला 30 डिसेंबरला इमर्जन्सी वापरासाठी मंजुरी दिली होती. हीच लस भारतात कोविशील्ड नावाने ओळखली जात आहे.
सीरमची लस साठवायला सोपी -कोरोनाची लस विशिष्ट तापमानात ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा तिची परिणामकारकता कमी होऊ शकते. सीरमच्या कोविशील्ड सोबत फायझर आणि मॉडर्ना कंपनीच्या लशी स्पर्धेत होत्या. मात्र फायझरची लस उणे 70 अंश सेल्सिअस तापमानात ठेवावी लागते. तर मॉडर्नाची लस साठवण्यासाठी डीप फ्रीजरची आवश्यकता असते. ऑक्सफर्डची लस मात्र सामान्य फ्रीजमध्येदेखील ठेवता येऊ शकते.
भारतासारख्या खंडप्राय देशासाठी कोरोना लशींचे उत्पादन करणे आणि त्यांचे वितरण करणे आव्हानात्मक आहे. यामध्ये सीरम इन्स्टिट्यूट महत्त्वाची भूमिका बजावेल. ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेकाने लशीच्या उत्पादनासाठी सीरमसोबत करार केला. पुण्यात मुख्यालय असलेली सीरम जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. भारतातच लशींचे उत्पादन होत असल्याने वितरण जास्त सुलभ होईल. देशात पहिल्या टप्प्यात जवळपास 30 कोटी लोकांना लस टोचण्यात येणार आहे.
उद्यापासून देशातील प्रत्येक राज्यात 'ड्राय रन'देशातील प्रत्येक राज्यात उद्या 2 जानेवारीपासून 'ड्राय रन' करण्यात येणार आहे. यासाठीच्या तयारीचा आढावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत एका बैठकीत घेण्यात येत आहे. याआधी पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाचे 'ड्राय रन' यशस्वीरित्या घेण्यात आले आहे.