संतुलित आहार नसणं आणि व्यायामाचा अभाव या कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. धकाधकीच्या जीवनात जीवनशैली पूर्णपणे बिघडून गेली आहे. जेवण झाल्यानंतर लगेच झोपणं किंवा दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून राहिल्याने धोका वाढत चालला आहे. रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपण्यासाठी जात असाल तर स्थुलतेसह अनेक आजार जडण्याची भीती असते. याचा थेट परिणाम तुमच्या पचनक्रियेवर पडू शकतो. रात्री जेवण झाल्यानंतर काही वेळ फेरफटका मारणं किंवा शतपावली करणं अत्यंत आवश्यक आहे. पण याकडे दुर्लक्ष केलंत तर उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थुलता, जठरासंबंधी आजार होण्याचा धोका कायम आहे.
जेवण झाल्यानंतर लगेच चालणं चांगलं की वाईट, जेवणानंतर किती वेळेपर्यंत फेरफटका मारायला हवा, जेवणानंतर चालण्याने काय फायदे होतात असे प्रश्न अनेकांना पडतात. दरम्यान, जेवणानंतर 15 मिनिटं फेरफटका मारल्यानंतर रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होऊ शकतं, असं एका अभ्यासात वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. टाइप-2 डायबेटिसचा धोका कमी करण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो. केवळ 2 मिनिटं चालूनही शरीराला चांगला फायदा मिळू शकतो.
जेवण झाल्यानंतर फक्त 2 ते 5 मिनिटं चालल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी करण्यास फायदा होऊ शकतो, असं एका स्पोर्ट्स मेडिसीन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या विश्लेषणात म्हटलं आहे. यात सात अभ्यास मांडण्यात आले आहेत. जेवण झाल्यानंतर बसून राहणं किंवा झोपणं तसंच काही वेळापर्यंत चालल्याने शरीरावर काय प्रभाव पडतो यावर विचार केला गेला. यात इन्शुलिन-रक्तातील साखरेचा स्तर याची तुलना करण्यात आली.
अभ्यासात काय आलं समोर?आरोग्याच्या दृष्टीने उचललं गेलेलं छोट्यातछोटं पाऊलही खूप महत्त्वाचं ठरतं. याचा बऱ्याच प्रमाणात फायदा होत असल्याचं ह्यूस्टन मेथोडिस्ट रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ (Heart Specialist) डॉ. केरशॉ पटेल यांनी म्हटलंय. सात अभ्यासात अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या. जेवणानंतर काही मिनिटे चालल्याने रक्तातील साखर कमी करण्यास मदत होऊ शकते. या अभ्यासात सहभागी झालेल्यांना जेवणानंतर सोफ्यावर झोपण्याऐवजी काही वेळासाठी फेरफटका मारण्यास सांगितलं गेलं. यात सुरुवातीला ब्लड शुगरचा स्तर वाढलेला होता; पण हळूहळू तो कमी कमी होत गेला.
डायबेटिसमध्ये रुग्णांच्या रक्तातील साखरेचं वाढतं प्रमाण रोखणं हे त्यांच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठीचा मोठा घटक आहे. रक्तातील साखरेची पातळी वाढणं किंवा कमी होणं हे टाइप-2 डायबेटिसचं लक्षण आहे. उभे राहिल्याने रक्तातील साखरेचा स्तर कमी ठेवण्यास मदत मिळते. पण चालल्यामुळे अधिक फायदा होतो, असं डॉ. केरशॉ पटेल यांनी सांगितलं.