जपानमधील लोकांना जगात सर्वात मेहनती मानलं जातं. येथील लोक सुट्याही कमी घेतात आणि काम जास्त करतात. आता यामुळे त्यांचा तणाव वाढताना दिसतो आहे. अशात आपल्या नागरिकांना तणान दूर करण्यासाठी जपान सरकारने एक नवी पद्धत आणली आहे. लोकांना तणावमुक्त करण्यासाठी त्यांना हसवण्याऐवजी त्यांना रडवण्यावर जास्त भर दिला जात आहे. कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आठवड्यातील एक दिवस जमेल तितकं रडण्यास प्रोत्साहित केलं जात आहे. रडण्याचे फायदे लोकांना सांगण्यासाठी खासप्रकारचे 'टीयर्स टीचर' म्हणजे अश्रूंचे ट्रेनर तयार केले जात आहे.
रडण्याच्या फायद्यांवर शोध
जपानमधील एका हायस्कूलमधील ४३ वर्षीय शिक्षिका हीदेफूमी योशिदा यांनी पाच वर्षांआधी रडण्यातून होणाऱ्या फायद्यांवर शोध आणि प्रयोग सुरु केला. आता त्यांना जपानमध्ये नामिदा सेंसेई म्हणजेच टीयर्स टीचर म्हणून ओळखले जाते. योशिदा यांना जपानी कंपनी आणि शाळांमध्ये मागणी वाढली आहे. त्यांना कंपन्या आणि शाळांमध्ये रडण्याचे फायदे सांगण्यासाठी बोलवलं जातं.
जपान सरकारने उचलले पाऊल
योशिदा यांच्या रडून तणावमुक्ती करण्याच्या एक्सपरिमेंट्सवर तोहो यूनिव्हर्सिटीच्या मेडिसिन फॅकल्टीचे प्रमुख प्रोफेसर हिदेहो अरिटा यांनीही शोध केला. या दोघांच्या प्रयोग आणि रिसर्चमधून हे सिद्ध झालंय की, हसण्या आणि झोपण्यापेक्षा रडल्याने तणावमुक्ती अधिक लवकर होते. आठवड्यातून एकदा रडल्याने स्ट्रेस फ्री लाईफ जगण्यास मदत मिळते. या शोधातून निघालेले परिणाम पाहता जपान सरकारने २०१५ मध्ये ५० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपन्यांमध्ये तणावमुक्तीसाठी हे पाऊल उचलणे अनिवार्य केले होते.
मानसोपचार तज्ज्ञही देतात रडण्याचा सल्ला
रडणे आणि तणाव यांच्यातील संबंध जाणून घेण्यासाटी १६ वर्षांआधी ३० देशांमध्ये एक सर्वे झाला होता. या सर्वेमध्ये सहभागी असलेल्या ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी हे मान्य केले होते की, तणावसोबत लढण्यासाठी त्यांना रडणे हा चांगला पर्याय वाटतो. तेच जगातल्या ७० टक्के मानसोपचार तज्ज्ञ तणावाने ग्रस्त असलेल्या लोकांना रडण्याचा सल्ला देतात.