- वंदना अत्रे(दुर्धर व्याधीग्रस्तांच्या मदतगटात कार्यरत)जीवनशैलीमुळे होणारे आजार हा सध्याच्या पिढीला ऐकावा लागणारा नेहमीचा वाक्प्रचार. जीवनशैली नावाच्या या अदृश्य जादूच्या पेटाऱ्यात कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, असा प्रश्न तुम्ही कधी स्वतःला विचारला आहे का? त्याची उत्तरे इतकी सोपी दिसतात की त्यामुळे कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात ते खरे वाटणार नाही.
काय आहे या पेटाऱ्यात? तुमचा आहार, त्याच्या वेळा, खाण्याच्या पद्धती, त्यामागे असलेले प्रयत्न आणि त्याचे पोषण मूल्य, तुमची विश्रांती, स्क्रीन टाइम, तुमचा विरंगुळा, मित्रांशी होणारा संवाद, व्यायाम आणि असे बरेच काही. या गोष्टी आपल्या दैनंदिन जगण्याशी जोडलेल्या आहेत. आणि वरवर बघता अगदी किरकोळ, बिन महत्त्वाच्या वाटाव्या अशाही. पण त्या आपल्या आयुष्यात छोटे छोटे तणावाचे अनेक क्षण आणत असतात. याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपले आरोग्य कसे राहणार हे ठरवत असतात. करिअर किंवा नोकरी आणि तिथली जबाबदारी याच्यापुढे आपल्यासाठी जेवण ही कायमच दुय्यम, बिनमहत्त्वाची बाब असते. कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीत पहिला बळी जातो तो जेवणाचा आणि विश्रांतीचा. अशी आणीबाणी चार-सहा महिन्यांतून एकदा येणे समजू शकते. पण दिनक्रमाला शिस्त नसल्याने दर दोन चार दिवसांनी आणीबाणी यायला लागली आणि दरवेळी आपल्या आहाराचा, विश्रांतीचा बळी जाऊ लागला तर त्याचा निव्वळ शरीरावर नाही स्वास्थ्यावर अधिक परिणाम होतो. मन सतत ताणात राहू लागते. दिनक्रमाला शिस्त का नाही याचा शोध घेताना पहिले कारण दिसते ते सोशल मीडिया किंवा रात्री उशिरापर्यंत डोळ्यापुढे सतत चालू असणाऱ्या स्क्रीनचे. त्यामुळेच सगळे मानसशास्त्रज्ञ आणि लाइफ कोच म्हणवणारे गुरू एकच गोष्ट आवर्जून सांगतात,
निरोगी राहायचे असेल तर दिनक्रम तपासून बघा. कोणत्या गोष्टीला तुमच्या आयुष्यात महत्त्व आहे ते तपासून बघा. त्यात आपल्या अनारोग्याची बीजे दिसतील. अशावेळी नेहमी मला माझे नोकरीचे दिवस आठवतात. कधीही वेळेवर न झालेले जेवण, दिवसभराचा ताण घालवण्यासाठी संध्याकाळी जंक म्हणावे असे काहीतरी तोंडात टाकत घालवलेला स्क्रीन टाइम हे सगळे आठवते... आणि आठवतो पाठोपाठ आलेला पहिला कॅन्सर !(lokmatbepositive@gmail.com)