आपण रोज सकाळी उठल्यावर दात घासतो. पण बऱ्याचदा दात घासल्यानंतरही तोंडातून दुर्गंध येत असतो. तोंडातून येणाऱ्या दुर्गंधामुळे लोकांसमोर मान खाली घालावी लागते. अनेकदा काही विशिष्ट पदार्थ खाल्याने अथवा तोंड कोरडे पडले की तोंडाला दुर्गंधी येते. अशावेळी बाहेर असलो की लगेच दात घासणे शक्य नसते. त्यावेळी पाण्याने चुळ भरून तात्पुरता उपाय केला जाऊ शकतो. परंतु काही असे घरगुती उपाय आहेत त्याचा वापर करून आपण तोडांची दुर्गंधी दूर करू शकतो. जाणून घेऊयात अशा काही घरगुती उपायांबाबत...
1. बडिशेप
बऱ्याचदा आपण जेवणानंतर अन्नाचे पचन व्हावे म्हणून बडिशेप खातो. पण हे उत्तम माउथ फ्रेशनर आहे. बडिशेप तोंडात लाळेची निर्मिती वाढवते त्यामुळे दुर्गंधी निर्माण करणाऱ्या किटाणूंचा नाश होतो.
2. पुदिना (मिंट)
पुदिन्याचा उपयोग आपण बऱ्याचदा जेवणातही करतो. पदार्थांच्या सजावटीसाठी पुदिन्याचा वापर करता येतो. पण पुदिना हे उत्तम माऊथ फ्रेशनर आहे. पुदिन्याचा तीव्र सुगंध आणि त्यात असलेल्या थंडाव्यामुळे काही क्षणात तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते. तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी पुदिन्याची 3-4 पाने खावीत.
3. वेलची
पदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी वापरली जाणाऱ्या वेलचीचा उपयोग माऊथ फ्रेशनर म्हणूनही केला जातो. एखादी वेलची तोंडात चघळल्यास तोंडाची दुर्गंधी चटकन नाहीशी होते.
4. दालचिनी
दालचिनीचा पदार्थ मसाल्याच्या पदार्थांमध्ये होतो. दालचिनीमध्ये जंतूनाशक घटक आहेत. तोंडाला येणारा दुर्गंध कमी करण्यासाठी दालचिनीचा उपयोग होतो.
5. लवंग
जेवणाची चव वाढवण्यासाठी लवंगाचा स्वयंपाकात उपयोग करण्यात येतो. तसेच दातदुखीवरही लवंगाचा उपयोग करण्यात येतो. एखादी लवंग चावल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते.