वाढते वजन ही वेगाने वाढणारी समस्या आहे. सगळ्या वयोगटात वजन वाढीची समस्यां दिसून येत आहे. त्याला बहुतांश जबाबदार आहे आपली दिनचर्या आणि चुकीची आहारपद्धती. ज्याला खरोखरच वजन कमी करायचे आहे, त्यांनी आहार नियोजनाची शिस्त, पुरेसा व्यायाम, आठ तास झोप आणि बाहेरच्या खाण्यावर प्रतिबंध घातला पाहिजे. गोड आणि तेलकट पदार्थांचे सेवन कमी केले पाहिजे. पोटापुरतेच जेवले पाहिजे. जिभेचे चोचले पुरवायचे या हेतूने अन्न ग्रहण करू नये. असे सल्ले आरोग्य शास्त्रात दिले जातात. त्याबरोबर एक उपाय सांगितला जातो, तो म्हणजे भरपूर पाणी पिण्याचा! पण भरपूर पाणी पिण्याने खरोखरच वजन कमी होते का? आणि झाले तरी त्यासाठी नेमके किती लिटर पाणी दररोज प्यायला हवे ते जाणून घ्या.
पाणी पिण्याचा मुख्य फायदा म्हणजे त्यात शून्य कॅलरी असते. त्यामुळे ते कितीही प्यायले तरी वजन वाढत नाही, उलट भूक शमते, पोट भरलेले असल्याची तृप्ती मिळते, भूक कमी होते आणि वजन कमी करण्यात मदत होते. यासाठी पाणी पिण्याचे प्रमाण वाढवले पाहिजे असा वैद्यकीय सल्ला दिला जातो. अन्नात समाविष्ट असलेल्या पाण्याव्यतिरिक्त पाणी प्यायले गेले पाहिजे असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. पण नेमके किती? तेही पुढे जाणून घेऊया.
वजन कमी करण्यासाठी वॉटर फास्टिंग करावे का?
वॉटर फास्टिंग म्हणजे पाण्यावर राहून उपास. यासाठी कोणतेही डॉक्टर परवानगी देत नाही. या उपायाने तुम्ही सलग आठवडाभर तग धरून राहू शकता, वजनही कमी होऊ शकते, परंतु शरीरात त्राण उरणार नाही, भुकेचा विपरीत परिणाम शरीरावर होऊ शकेल. म्हणून वैद्यकीय सल्ल्याशिवाय या गोष्टी करू नयेत.
शीतपेय नको, पाणीच प्या:
दुधाची तहान ताकावर भागवणे ठीक आहे, पण कोल्ड्रिंक वर नको! कोल्ड्रिंक वजनवाढीला पूरक आहे. म्हणून जेव्हा जेव्हा वजन कमी करण्याचा प्रयत्न सुरु कराल, तेव्हा तेव्हा कोल्ड्रिंकच्या जागी कोमट पाणी किंवा माठातले पाणी प्या आणि तहान भागवा. जेणेकरून पोट भरेल आणि कॅलरी पण वाढणार नाहीत.
अधिक पाणी पिण्याच्या टिप्स
>> प्रत्येक वेळी काही खाण्याआधी पाणी प्या. त्यामुळे दोन घास कमी खाल्ले जातील. >> कुठेही जाताना पाण्याची बाटली जवळ ठेवा आणि दर अर्ध्या तासाने एक एक घोट पाणी पित राहा. >> व्यायाम करताना किंवा शारीरिक कामे करताना जास्त पाणी प्या.>> दमट वातावरण तसेच प्रखर सूर्यप्रकाश असताना भरपूर पाणी प्या.>> झोपताना पाण्याची बाटली जवळ ठेवा. रात्री तहान लागल्यावर उठण्याचा कंटाळा करणार नाही. >> व्हेजिटेबल सूप तसेच वरण, आमटी, ताक यांचे प्रमाण जेवणात वाढवा. >> जास्त पाणी असलेली फळे आणि भाज्या खा, विशेषत: बेरी, द्राक्षे, कलिंगड, टोमॅटो, काकडी इ. चा वापर करा.
नेमके किती पाणी प्यावे :
आरोग्य शास्त्रानुसार स्त्रियांनी ८ ग्लास तर पुरुषांनी १३ ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे तुमची पचनक्रिया सुरळीत होईल आणि वजन कमी व्हायला मदत होईल.