Weight Loss Tips : सध्या धावपळीच्या जीवनात अनेकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यात लोक सगळ्यात जास्त हैराण आहेत ते वजन वाढण्यामुळे. अशात लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपायही करतात. पण काहींना यश मिळतं तर काहींना नाही.
वजन कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लोक जिम जॉईन करण्याचा विचार करतात. मात्र असं नाही की, जिमला गेले नाही तर वजन कमी होणार नाही. वजन कमी करण्यासाठी आणखीही अनेक पर्याय आहेत. त्यातील सर्वात जास्त फॉलो केला जाणारा आणि सोपा पर्याय म्हणजे वॉकिंग म्हणजेच पायी चालणे. वेगवेगळ्या रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे की, वजन कमी करण्यासाठी पायी चालणे फार महत्त्वाचे आहे. सोबतच याने हृदयासंबंधी आजारांचाही धोका कमी होतो.
वजन कमी करण्यासाठी पायी चालणे हा सर्वात चांगला पर्याय ठरू शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी तुम्हाला पैसेही खर्च करावे लागत नाहीत. तसेच याला वेळीची कोणतीही बंधने नाहीत. तुम्ही सकाळी, दुपारच्या जेवणानंतर आणि डिनरनंतरही चालू शकता. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की, वजन कमी करण्यासाठी म्हणून किती पावले चालावी? चला जाणून घेऊ याचं उत्तर...
किती पायी चालावं?
तुम्ही जर नुकतंच वजन कमी करण्यासाठी पायी चालणे सुरू केले असेल तर तुम्ही तुमचं स्वत:चं एक लक्ष्य ठरवा. सुरूवातीला तुम्ही दररोज 10 हजार पावले चालू शकता. एकदा तुम्हाला इतकं चालण्याची सवय झाली की, मग तुम्ही हे वाढवा. नंतर तुम्ही 12 हजार, 15 हजार पावले चालू शकता.
पायी चालण्यासाठी काही टिप्स
जर तुम्ही दिवसभर डेस्क जॉबमध्ये व्यस्त राहत असाल तर तुमच्यासाठी वजन कमी करणे फारच मोठं आव्हान आहे. त्यामुळे कामाच्या अधेमधे छोटे ब्रेक घ्या आणि चालत रहा. तुम्ही लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर कराल तर तुम्हाला चालण्यासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज पडणार नाही. ऑफिस जवळ असेल तर गाडीने जाण्याऐवजी चालत गेले तर तेवढाच फायदा तुमचा.
वयानुसार कुणी किती पावले चालावी?
एका रिसर्चनुसार, 6 ते 17 वयोगटातील मुलांनी दररोज 15 हजार पावले चालावीत. तर या वयोगटातील मुलींनी 12 हजार पावले चालावीत. तर 18 ते 40 वयोगटातील महिला आणि पुरूषांनी 12 हजार पावलं चालावे. 40 ते 50 वयोगटातील महिलांनी दररोज 11 हजार पावले चालले पाहिजे. तर 50 पेक्षा जास्त वय असलेल्या पुरूषांनी 11 हजार पावले चालावीत.