- मयूर पठाडे‘हो, तुम्ही लठ्ठ आहात!’, कोणालाही नुसतं असं म्हणून पाहा, तो लगेच कबुली देईल, ‘हो, ना, अलीकडे वजन फारच वाढलंय. कमी करण्याचा प्रयत्न करतोय, करतेय, पण फारसा काही फरक पडला नाही. पुढे त्या व्यक्तीला असंही विचारा, ‘तुम्हाला सांधेदुखीचाही त्रास असेलच. गुडघे दुखत असतील, सांधे, जॉइंट्स त्रास देत असतील..’ - याही गोष्टीची ती व्यक्ती ताबडतोब कबुली देईल.. ती व्यक्ती जर पन्नाशीच्या पुढे असेल तर हे समीकरण बहुदा तंतोतंत जुळतं. सर्वसाधारणपणे हे चित्र आपल्याकडे सर्रास दिसून येतं. ज्या व्यक्तींना गुडघेदुखी, सांधेदुखीचा त्रास असतो, त्यांचं वजनही बहुदा जास्त असतं. अर्थात ‘जास्त’ म्हणजे त्या त्या व्यक्तीच्या आणि त्याच्या तरुणपणाच्या वजनाच्या तुलनेत!हे रिलेशन आता शास्त्रज्ञांनीही उलगडून दाखवलंय. पण त्यासाठी त्यांनी तब्बल २१ वर्षे संशोधनही केलं आणि त्यातली केवळ सत्यासत्यताच नाही, तर इतर अनेक गोष्टीही तपासून पाहिल्या. लठ्ठपणाचा संबंध नेमका कशाशी जोडला जातो? कोणाला लठ्ठ म्हणायचं? त्या त्या व्यक्तीचा बॉडी मास इंडेक्स म्हणजेच बीएमआय, त्या व्यक्तीच्या पोटाचा घेर, त्याभोवती साचलेली चरबी आणि फॅटच शरीरातील जास्तीचं प्रमाण.. या प्रमुख घटकांवर तुमचा लठ्ठपणा अवलंबून असतो आणि त्यावरच ती व्यक्ती लठ्ठ आहे की नाही, लठ्ठपणाचं प्रमाण किती आहे हे ठरवलं जातं. डेन्मार्कच्या शास्त्रज्ञांनी ५० ते ६४ या वयोगटातील काही स्त्री आणि पुरुषांचा अभ्यास केला. तब्बल २१ वर्षे यासंबंधीचा त्यांचा अभ्यास सुरू होता. त्यातून त्यांनी काढलेला निष्कर्ष असा, की ज्या व्यक्ती लठ्ठ आहेत, त्यांना संधीवाताचा त्रास जास्त होतो, त्यातही महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आहे.
ज्या महिलांचं वजन प्रमाणापेक्षा जास्त असेल, तुलनेनं अधिक लठ्ठ असतील, तर त्यांच्यात संधीवाताचं प्रमाण जास्त असतं किंवा त्यांना संधिवात होण्याचा धोका अधिक प्रमाणात वाढतो.आश्चर्यकारकपणे लठ्ठपणा आणि संधिवाताचं हे समीकरण पुरुषांमध्ये मात्र शास्त्रज्ञांना आढळून आलं नाही. जे पुरुष लठ्ठ आहेत, त्यांना भविष्यात संधिवात होईलच, हे मात्र ठामपणे सांगता येऊ शकत नाही. महिलांसाठी मात्र हे मोठ्या प्रमाणात लागू आहे, असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे.
त्यामुळे महिलांनो, तुमचं वजन आणि लठ्ठपणा वाढू देऊ नका. तरुणपणीच ही काळजी घेतली तर उत्तरायुष्यात अनेक विकारांपासून, त्यातही संधिवातासारख्या अतिशय त्रासदायक विकारापासून तुमची सुटका होऊ शकते. आयुष्याच्या सायंकाळीही आपलं आरोग्य टिकवायचं असेल, नातवंडं, पतवंडं यांना तुमच्या अनुभवाचा फायदा द्यायचा असेल, प्रेमानं त्यांचे लाडकोड करायचे असतील, त्यांना अंगाखांद्यावर फिरवायचं, मिरवायचं असेल तर ही काळजी आतापासूनच घ्या..