बाबा रामदेव हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर येते ते त्यांचे पोटातल्या पोटात गोलाकार फिरणारे मिक्सर ग्राइंडर! योगविद्येच्या अभ्यासातून त्यांनी शरीराला अत्यंत लवचिक बनवले आहे. त्यांचं वळणारं अंगं पाहून बघणाऱ्यांची बोबडी वळते. ते विविध शहरातून, देशातून फिटनेसचे धडे देतात, योग शिबीर आयोजित करतात, हेल्थ टिप्स देतात. निवासी शिबीर घेऊन लोकांचे वजन उतरवण्याला हातभार लावतात. त्यांनी त्यांचे हेल्थ सिक्रेट शेअर करत असतानाच अमित शाह यांचे २५ किलो वजन कसे कमी झाले हेही सांगितले आहे.
बाबा रामदेव यांची जीवनशैली आणि आहार कसा आहे ते पाहू!
रामदेव बाबा आयुर्वेदावर भर देतात आणि लोकांनाही आयुर्वेदिक औषधांचा वापर करा असे सांगतात. मात्र स्वतः बाबाजींना कोणत्याही औषधाची विशेष गरज लागत नाही. कारण योग्य आहारपद्धतीचा अवलंब करून त्यांनी स्वतःचे स्वास्थ्य उत्तम ठेवले आहे. त्यांच्यासारखे निरोगी शरीर आपल्याला मिळावे असे वाटत असेल तर त्यांची आहारपद्धती अनुसरायला हवी.
बाबा रामदेव सांगतात....
आपल्या आरोग्याच्या बाबतीत ८० टक्के डाएट आणि २० टक्के व्यायाम याचा सकारात्मक परिणाम शरीरावर दिसून येतो. व्यायामाने शरीर लवचिक होतं आणि ध्यानधारणेने मग शांत आणि स्थिर होतं. ध्यान स्थिर होण्यासाठी वासना कमी करायला हव्यात. म्हणून सर्वप्रथम आहारावर नियंत्रण हवे! ते पुढीलप्रमाणे करता येईल.
निरोगी आयुष्य जगण्यासाठी बाबा रामदेवांच्या टिप्स आणि अमित शाह यांच्या वेट लॉसचे सिक्रेट :
>> सकाळी उठल्यावर गायीचे एक चमचा शुद्ध तूप खा.
>> तेलकट, गोड पदार्थ टाळा, निदान कमी करा. अतिरिक्त मिठाचे सेवन टाळा.
>> शक्य तेवढं धान्य कमी खा! बैठं काम करणाऱ्यांना धान्य खाण्याची गरज नाही, खाल्ल्यास ते नीट पचत नाही आणि त्याचे रूपांतर ऊर्जेत न होता चरबीत रूपांतर होते. भात, पोळी, भाकरी याची गरज कष्टकरी लोकांना जास्त असते. बैठे काम करणाऱ्यांनी नैसर्गिक, ताज्या गोष्टींचे सेवन करा.
>> ७-८ तास झोप आवश्यक असे सगळे सांगतात, पण कोणासाठी? तर शारीरिक काम करणाऱ्यांसाठी! बैठे काम करणाऱ्यांनी तसेच चाळीशी ओलांडलेल्या लोकांना ६ तास झोप पुरेशी ठरते.
>> जेवणाच्या सुरुवातील कच्या भाज्या, फळे जास्तीत जास्त खा!त्यामुळे जठराग्नी प्रज्वलित होतो आणि मग खाल्लेले जेवण पचते.
>> ज्यांना शक्य असेल त्यांनी उपासाच्या दिवशी फक्त नारळपाणी प्यावे आणि फार तर फलाहार करावा.
>> चाळीशीनंतर एक वेळच जेवा. सगळ्या रोगांपासून दूर राहाल! बाबा रामदेव दुपारी १२ वाजता दिवसातून एकदाच जेवतात. जेवणात फळं, सॅलड खाऊन झाल्यावर शुद्ध तुपात किंवा राईच्या तेलात शिजवलेले अन्नच खातात.
>> संध्याकाळी ७ नंतर जेवू नका, आपसूक इंटरमिटंट फास्टिंग घडेल. अमित शाह यांनी देखील याच पद्धतीचा अवलंब करून २५ किलो वजन कमी केले.
>> आहार आणि विचारात सकारात्मकता आणा, सक्रिय राहा, नवनवीन गोष्टी शिकत राहा.