केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 01:35 PM2024-05-08T13:35:06+5:302024-05-08T13:35:24+5:30
West Nile fever : केरळमधील सर्व जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत, कारण राज्यातील तीन शहरांमध्ये या आजाराची प्रकरणे समोर आली आहेत.
West Nile fever : केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा झपाट्याने पसरत आहे. हा आजार संक्रमित डासांच्या चाव्याद्वारे पसरतो. यामुळेच केरळ सरकारच्या आरोग्य विभागाने मंगळवारी (७ मे) राज्यात वेस्ट नाईल तापाबाबत अलर्ट जारी केला आहे. तसेच, केरळमधील सर्व जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत, कारण राज्यातील तीन शहरांमध्ये या आजाराची प्रकरणे समोर आली आहेत. वेस्ट नाईल तापाबाबत केरळ आरोग्य विभाग पूर्णपणे सक्रिय झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यांमध्ये वेस्ट नाईल आजाराच्या संसर्गाची १० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. उत्तर केरळमधील दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी पाच रुग्ण आढळले आहेत. १० संसर्गांपैकी नऊ रुग्ण बरे झाले आहेत तर एक कोझिकोड येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. याशिवाय, दोन व्यक्तींचा मृत्यू वेस्ट नाईल तापामुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
वेस्ट नाईल काय आहे?
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), वेस्ट नाईल आजार (West Nile fever) संक्रमित डासांच्या चाव्याद्वारे मानवांमध्ये पसरतो. जेव्हा डास संक्रमित पक्ष्यांना खातात, तेव्हा त्यांना संसर्ग होतो आणि हा विषाणू मानव आणि इतर प्राण्यांमध्ये पसरतो. वेस्ट नाईल आजार हा फ्लॅविव्हायरस वंशाचा सदस्य आहे आणि जपानी एन्सेफलायटीस अँटीजेनिक सेरोकॉम्प्लेक्सशी संबंधित आहे.
वेस्ट नाईलची लक्षणे काय आहेत?
यूएस-आधारित सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, वेस्ट नाईल आजारची लागण झालेल्या १० पैकी आठ लोकांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत आणि ते स्वतःच बरे होऊ शकतात. मात्र, इतरांना ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, उलट्या आणि अतिसाराचा त्रास होतो. काही प्रकरणांमध्ये, एन्सेफलायटीस किंवा मेंदुज्वर यासारखे गंभीर आजार असू शकतात. ज्याचे घातक न्यूरोलॉजिकल परिणाम होऊ शकतात. तसेच, मृत्यू देखील होऊ शकतो.
निदान आणि उपचार काय आहेत?
संसर्गाचे निदान करण्यासाठी IgG अँटीबॉडी सेरो-कन्व्हर्जन, IgM अँटीबॉडी कॅप्चर एन्झाइम-लिंक्ड इम्युनोसॉर्बेंट ऍसे (ELISA), न्यूट्रलायझेशन ऍसे आणि सेल कल्चरद्वारे चाचण्या केल्या जाऊ शकतात. या आजारावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. गंभीर प्रकरणांमध्ये, रूग्णांना रूग्णालयात दाखल करावे लागते.