कधी कधी छातीत खूप कफ असतो, तो खोकताना छातीत वाजतो, पण सुटत नाही. खोकून खोकून बरगडय़ा-पोटात दुखायला लागते, दम लागतो. म्हणूनच कफाने गंभीर स्वरुप धारण करण्याआधी जाणून घ्या त्याची लक्षणे अन् उपाय. डॉ. अनुराग शर्मा यांनी ओन्लीमायहेल्थ या वेबसाईटला याची माहिती दिली आहे.
कफ कसा तयार होतो?श्वसन प्रणालीच्या आतील बाजूस आवरण असते आणि त्यामुळे श्लेष्मा नावाचा जाड आणि चिकट द्रव तयार होतो. जेव्हा धूळ कण किंवा धूर यासारख्या बाहेरील गोष्टी शरीरात प्रवेश करतात तेव्हा हे अस्तर श्लेष्मा तयार करण्यास सुरवात करते. हा श्लेष्मा बाहेर टाकण्यास अयशस्वी झाल्यास छातीत कफ तयार होतो.
छातीत कफ जमण्याची लक्षणे
- जोरदार खोकला
- खोकताना घरघर असा आवाज येणे
- वाहते नाक
- खोकल्यामुळे छातीत दुखणे
- खोकल्यावर बलगम येणे
- काही गंभीर स्थीतीमध्ये खोकल्यानंतर कफासोबतच रक्तही पडते
कफामुळे होणारे आजार
- सर्दी आणि खोकला : कमी तापमान आणि हवेमधील प्रदूषण यामुळे श्वसनमार्गाचा दाह होतो. यामुळे नाकातून पाणी, शिंका आणि कफयुक्त खोकला सुरू होतो. घसा दुखतो, प्रसंगी तापही येतो. श्वसनमार्गाचे विषाणूही याला कारणीभूत असतात.
- ब्रॉन्कायटिस : हवेतील धुलीकण, वाहनातील उत्सर्जित वायू आणि इतर रसायनेही श्वसनमार्गात गेल्यामुळे श्वसननलिकांना दाह होऊन त्या आकुंचन पावतात आणि त्यामध्ये अधिक प्रमाणात कफ निर्माण होतो. यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊन दम लागतो. यामध्ये विषाणू अथवा इतर जंतूसंसर्ग झाल्यास हिरवा-पिवळा कफ येऊन ताप येतो. तीव्र स्वरूपात ब्रॉन्कायटिस झाल्यास रुग्ण अत्यवस्थ होऊन त्याच्या शरीरात ऑक्सिजनचा अभाव निर्माण होतो.
- दमा : हवेचे कमी झालेले तापमान आणि प्रदूषण हे अस्थमाचा आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी घातक ठरते. नियमितपणे औषधाची गरज असणाऱ्या आणि कधीतरी औषधांची गरज लागणाऱ्या स्थिर रुग्णांनाही त्रास होऊ लागतो. त्यांच्या श्वासनलिका आकुंचन पावतात आणि कफाचे प्रमाण वाढते. यामध्ये जंतुसंसर्ग झाल्यास दम्याचे प्रमाण वाढून रुग्णालयात तातडीने दाखल होण्याची गरज पडते.
- न्युमोनिया : प्रदूषण व घटलेले तापमान यामुळे श्वसनमार्गाची प्रतिकार शक्ती कमी होऊन जंतुसंसर्ग झपाट्याने होण्यास मदत होते. फुफ्फुसांना सूज येऊन त्या भागात कफ जमा होतो. यामध्ये रुग्णाला खोकला, ताप येऊ लागतो. फुफ्फुसाचा बराच भाग बाधित झाल्यास श्वास घेण्यास त्रास होऊन दम लागतो आणि रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ होते. याशिवाय थंड हवा आणि हवेच्या खालच्या थरामध्ये स्थिर झालेले प्रदूषण यामुळे डोळ्यांची जळजळ होणे, गुदमरल्यासारखे वाटणे, नाक व घसा जळजळणे, शिंका येणे, खोकला, घसा खवखवणे या गोष्टी त्रस्त करतात.
- टीबी: तीन आठवड्यांपेक्षाही जास्त काळ साठलेला कफ, सततचा खोकला आणि त्यासोबत बाहेर टाकला जाणारा कफ ही टीबीची मुख्य कारणे आहेत. याचबरोबर ताप, वजन घटणे, भूक कमी होणे अशीही लक्षणे आढळतात. ह्यांपैकी कोणतेही लक्षण तीन आठवड्यांपेक्षा जास्त टिकल्यास त्याला टीबी झाला आहे असे समजावे. अशावेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कफावर उपाय
- लिंबू : लिंबामध्ये असणारे सी-व्हिटॅमिन आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. लिंबामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे वारंवार होणारी सर्दी आणि कफ यांची समस्या कमी होण्यास उपयोग होतो.
- लसूण : लसूण आहारातील एक अतिशय महत्त्वाचा पदार्थ आहे. दिवसात प्रत्येकाने किमान ५ ते ६ लसूणाच्या पाकळ्या खाव्यात. लसणामध्ये असणारे गुण आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे तुम्हाला सर्दी-खोकल्याचा त्रास वारंवार होत असेल तर तुम्ही आहारात लसूण आवर्जून ठेवा.
- आले : आल्यामध्येही अनेक उपयुक्त गुणधर्म असतात जे कफ आणि सर्दीच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी उपयुक्त ठरु शकतात. आले चवीला काही प्रमाणात तिखट असले तरीही आहारात त्याचा योग्य त्या प्रमाणात समावेश असायलाच हवा.
- गुळण्या करणे : गुळण्या करणे हा घसा, सर्दी आणि कफासाठी एक उत्तम उपाय आहे. गरम पाण्यात मीठ आणि हळद टाकून गुळण्या केल्यास घशाचा संसर्ग लवकर बरा होतो. सर्दीचे विषाणू सर्वात आधी आपल्या घशावर आक्रमण करतात. त्यामुळे दिवसातून ३ ते ४ वेळा साध्या कोमट पाण्याने केलेल्या गुळण्याही कफासाठी उपयुक्त ठरतात.
कफ झाल्यावर डॉक्टर काय करतात?कफ झाल्यावर डॉक्टर बलगम चेक करतात. बलगमचा रंग किंवा रक्त तर पडत नाही ना याची तपासणी केली जाते. छातीचा एक्स रे देखील काढला जातो. छातीत कफ कोणत्या कारणामुळे जमा झाला आहे याचे योग्य निदान त्या रोगाची कारणे जाणून केले जाते.