मुंबई- तुमच्या पायाची नखं तुटली आहेत का? त्यांचा रंग बदलला आहेका, किंवा नखं जाडजूड झाली असतील तर त्याकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे. कधीकधी नखांजवळ वेदनाही होत असतात. ही सर्व बुरशीच्या संसर्गाची लक्षणे आहेत. नखांना बुरशीचा संसर्ग होऊन गुंतागुंत वाढणे हे बहुतांश लोकांच्या बाबतीत घडताना दिसते. साठी उलटलेल्या प्रत्येकी ४ लोकांमागे ३ लोकांना आणि तरुण गटात प्रत्येक ५ लोकांमागे एका व्यक्तीस नखांच्या बुरशीचा त्रास संभवतो. बुरशीचा संसर्ग पायाच्या बोटांप्रमाणे हाताच्या बोटांनाही होऊ शकतो, पण बहुतांश वेळा हा संसर्ग पायाच्या बोटांवरच आढळतो. जर तुम्हाला टाइप टू डायबेटिस असेल तर नखांची काळजी गांभिर्याने घेण्याची गरज आहे. मधुमेही रुग्णांच्या पायाच्या नखांना संसर्ग होण्याची शक्यता दुप्पट असते. हा संसर्ग एका मर्यादेच्या पुढे गेल्यास अॅम्प्युटेशनही (अवयव कापून काढणे) करावे लागू शकते. त्यामुळे नखांच्या बाबतीत थोडीशीही समस्या असल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी. नखांना बुरशीचा संसर्ग झाल्याची काही वेगळी लक्षणेही आहेत. त्यामध्ये इनग्रोन टोनेल्स म्हणजे पायाच्या बोटांची नखं आतल्या बाजूंना वाढलेली असणं महत्त्वाचे लक्षण आहे. नखांच्या दोन्ही बाजूच्या कडा व त्यांचं टोक खोल आतवर रुतलेलं असल्यामुळे तेथील त्वचेजवळ दुखू लागते. बॅक्टेरियाचा संसर्ग झाल्यामुळे नखं जाड वाटू लागतात आणि नखांच्या आजूबाजूची त्वचा आणि क्यूटीकल (नख जेथून सुरु होते तेथे त्वचेचा थोडा पातळ भाग नखावरती आलेला असतो) लाल झालेले असते तसेच ते सुजलेलेही असते. याप्रमाणेच मोलानोमा नावाचा एक दुर्मिळ आणि अत्यंत त्रासदायक असा त्वचेचा कर्करोग असतो. हा रोग फारसा आढळा नसला तरी यामध्ये नखाच्या आतल्या भागात काळसर झाक येऊ लागते. त्यामुळे नखांवर बारिक लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
सतत दलदल, पाणथळ भागात फिरणे यामुळे बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. पोहण्याच्या तलावामध्ये दीर्घकाळ पोहणे, पाण्यात भिजलेले, दलदलीत वापरलेले बूट वारंवार वापरणे, अंगठ्याच्या नखाजवळ जखम होणे यामुळे बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. बुरशीचा संसर्ग झाल्यावर तेथे पांढरे ठिपके दिसू लागतात मग ते पिवळे, हिरवे किंवा तपकिरी होऊ लागतात. नखं कधी अतिशय घट्ट तर काही वेळा पातळ होतात, ठिसूळ होतात, वरच्या किंवा आतल्या बाजूस गोलाकार वाढतात. नखाजवळ दुखू लागते. आपल्या नखांना बुरशीचा संसर्ग झाला आहे अशी शंका येताच किंवा नखांशी संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. नखांच्याबाबतीत डॉक्टरांची भेट लवकरात लवकर घेतली पाहिजे कारण वेळ गेल्यास त्रास वाढू शकतो. संसर्ग टाळण्यासाठी पाय नेहमी कोरडे आणि स्वच्छ ठेवण्याची गरज आहे..