लव्हली शर्मा, (संकलन : महेश घोराळे)
जीवन हे कोणाचेही लक्ष्य असू शकत नाही. तर जीवन हा एक प्रवास आहे. हा प्रवास कुणी ‘भागदौड’ करून पूर्ण करतो, कुणी चालत, कुणी कायम चिंतित राहून तर कुणी हसत खेळत पूर्ण करतो. त्यामुळे कसे जगायचे हे तुम्हीच ठरवू शकता. पण एक मात्र खरे आहे की, प्रत्येकाच्या जीवनात कमी अधिक प्रमाणात चढ-उतार असतातच. त्याशिवाय जीवन नाही. आपल्या हार्ट बिट्सच्या लाईन तुम्ही पाहा. त्यामध्ये चढउतार दिसतो तोपर्यंत तुम्ही जिवंत असता. तीच लाईन सरळ झाली तर तुम्ही जिवंत नसता.
मृत्यू हे अंतिम सत्य आहे. पण आज लोक नुसते सैरावैरा धावत आहेत. घड्याळाच्या काट्यावर ते पळत सुटत आहेत. ‘काम आहे’ असे म्हणत ते नीट जेवतही नाहीत. स्वतःच्या आयुष्याला द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ही धावपळ कशासाठी? तुम्हाला जायचे तरी नेमके कुठे?
मौन बाळगायला शिका
कुणी नाराज होऊन तुमच्याशी बोलत असेल तर तुम्हीही आक्रमक होऊन लगेच त्याला उत्तर देऊ नका. एकदा त्याला पूर्णपणे ऐकून घ्या. त्याला समजून घ्या. तो शांत होईल तेव्हा तुमचा विचार मांडा, त्याला समजावून सांगा. हे एक कौशल्य आहे. अनेकदा व्यर्थ बोलल्यामुळे प्रश्न उपस्थित होतात, त्याचा मनस्ताप भोगावा लागतो. त्यामुळे योग्य वेळी पण मोजकं बोला, मौन बाळगायला शिका.
पाहिलं तर सर्व काही, मानलं तर काहीच नाही
- पाहिलं तर सर्व काही आहे आणि मानलं तर काहीच नाही, अशी स्थिती आहे, त्यामुळे समाधानी राहणं शिकलं पाहिजे.
- पैसा संपत्ती या गोष्टी येतात आणि जातात पण तुमचे नाव, प्रतिमा कायम राहते.
- तुमच्याजवळ जे चांगले, मित्र, नातेवाईक आहेत, त्यांना भरपूर वेळ द्या. कारण तुम्हालाही कुणाच्यातरी वेळेची गरज असेल.
- भविष्याची चिंता करून आजचा दिवस खराब करू नका.
- नुसत्या विचाराने किंवा नशीब, भविष्यावर विश्वास ठेवून काही होणार नाही, त्यासाठी मेहनत करावी लागेल.
- जेव्हा तुम्हाला वाटेल की माझ्या आयुष्यात खूप अडचणी आहेत. तेव्हा त्या लोकांकडे पाहा ज्यांना हातपाय नाहीत.