- मयूर पठाडेतुमची आजी, आजोबा.. एवढं वय झालं, पण अजूनही धडधाकट आहेत की नाहीत?.. रोज सगळी कामं वेळच्या वेळी आणि स्वत:ची स्वत: करतात, रोज सकाळी फिरायला जातात, नातवंडं, पतवंडांसोबत छान खेळतात.. मुलांनाही त्यांची सोबत फारच आवडते.. आजी-आजोबांशिवाय त्यांनाही बिलकुल करमत नाही.. आजी-आजोबांचं हे चैतन्य घरभर कसं विखुरलेलं असतं आणि आपल्यालाही ते प्रफुल्लित करीत असतं..पण थांबा, तुम्हाला आजकाल असं वाटायला लागलंय का, कि आजी-आजोबांचा चालण्याचा वेग किंचित मंदावलाय, पूर्वीच्या तुलनेत अलीकडे ते थोडं हळूहळू चालायला लागलेत.. तुम्हाला जर असं वाटत असेल, तर शंकेला जागा आहे. त्यांना ताबडतोब डॉक्टरांना दाखवा.. कारण या वयात तुमच्या हालचाली अगदी थोड्या का मंदावलेल्या असेना, स्मृतीभ्रंशाकडे तुमची वाटचाल सुरू झालेली असू शकते. डिमेन्शिया, अल्झायमर.. यासारख्या आजारांची ती सुरूवात असू शकते.
त्यामुळे हालचाली मंदावल्याची थोडी जरी शक्यता वाटली, तरी लगेच आपल्या आजी-आजोबांना चांगल्या डॉक्टरांकडे दाखवा. त्यांच्या साऱ्या तपासण्या करून घ्या. स्मृतीभ्रंशाची ही लक्षणं जर खरीच असली, तर वेळेवर उपचार करून त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवता येतं. त्यासाठी आजी-आजोबांनीही स्वत:कडे लक्ष द्यायला हवं. अगदी आपल्या मुलांनी आणि नातवंडांनीच त्याबाबत तुम्हाला सावध करायला हवं असं नाही. ज्येष्ठांनीही ही लक्षणं जर त्यांच्यात अचानक दिसायला लागली असतील, तर वेळीच काळजी घेण्याची गरज आहे.
अमेरिकेत नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात हे लक्षात आलं आहे, की, तुमच्या हालचाली जर मागच्या वर्षाच्या तुलनेत अगदी ०.१ सेकंदानं जरी कमी झाल्या असतील, तरी डिमेन्शिया, अल्झायमर आणि स्मृतीभ्रंशासारख्या आजारांचा तुमचा धोक तब्बल ५० टक्क्यांच्या आसपास वाढू शकतो!आपल्या मेंदूच्या उजव्या बाजूला स्मृती आणि हालचालींवर नियंत्रण ठेवणारा एक भाग असतो. साधारणपणे समुद्री घोड्यासारखा त्याचा आकार असतो. हा भाग जर आकुंचन पाऊ लागला तर तुमच्या स्मृती आणि चालण्याफिरण्यावरही त्यामुळे मर्यादा येतात.
अर्थात वयोमानानुसार तुमचे मसल्स कमजोर होणे, गुडघेदुखी, डायबेटिस, हृदयरोगासारखे वेगवेगळे आजार.. यामुळेही तुमच्या हालचालींवर मर्यादा येऊ शकतात, पण या साऱ्या गोष्टींकडे जर वेळीच लक्ष दिलं, तर नंतरच्या मोठ्या संकटातून आपली सुटका होऊ शकते, एवढं नक्की!त्यामुळे आपल्या हालचाली जर थोड्याही मंदावल्या असतील तर त्याकडे बिलकूल दुर्लक्ष करू नका, वेळीच त्यावर उपचार करा आणि कायम हसते-फिरते, आनंदी राहा. आपल्या चैतन्याचा सुगंध कायम सगळीकडे पसरू द्या..