स्वयंपाकघरात नक्की काय शिजतंय?- या पूर्वार्धात म्हटल्याप्रमाणे सांजा अथवा लापशी, भरडा हे प्रकार प्रागैतिहासिक काळापासून भारतात अस्तित्वात होतेच. धान्यं दळून भरड, रवा, पीठ काढणं या क्रियांवर मानवाने हळूहळू प्रभुत्व मिळवलं. उकळत्या पाण्यात पीठ शिजवणं या प्रक्रियेमुळे मानवाने उत्क्रांतीतला एक महत्त्वाचा टप्पा गाठला. कारण शिजवल्यामुळे धान्ये पचनसुलभ झाली. त्यांचे पोषक गुण मानवाच्या अंगी लागू लागले.
माणसाचं आयुर्मान वाढलं; कारण वृद्धांच्या आहाराची सोय झाली. लहान बाळांच्या आहारातही प्रचंड क्रांती झाली. धान्यांचं खिमट, पातळ पेज, लापशी हा पचायला हलका पण बलवर्धक शिशुआहार (ज्याला सध्या सीरियल म्हणतात) जवळजवळ बारा हजार वर्षांपूर्वीचा आहे बरं. थोरांसाठीदेखील दणकट नाश्ता म्हणून याची महती जबर. पूर्वीपासून भारतात ज्वारीची/ नाचणीची प्रवाही आंबील, पेज, लुसलुशीत उपमा, शिळा भात रात्रभर पाण्यात भिजवून केलेला पांथा भात, उकड, उकडपेंडी असे कैक प्रकार श्रमिकजन सकाळी खात असत, आजही खातात. पश्चिमी देशांत अठराव्या शतकापर्यंत सीरियलसारखा साधासुधा नाश्ता गरिबाघरचा म्हणून हिणवला गेला; पण गेल्या शतकातल्या संशोधनामुळे या पदार्थांतून मिळणारं पोषण अभिजन वर्गाच्या लक्षात यायला लागलं. दूध फार मोठ्या कालखंडानंतरचं. उंट, बैलांना माणसाळवण्याची सुरुवात दहा हजार वर्षांपूर्वी झाली असली तरी मानवाने प्राणिज दुधाचा समावेश आपल्या आहारात केला तो सहा-सात हजार वर्षांपूर्वी. तेव्हा नाश्त्याच्या पेजेमध्ये, धान्यांच्या भरडीमध्ये दूध, तूप, ताक इत्यादींचा प्रवेश झाला. कालांतराने साखर, गूळ सहज उपलब्ध होऊ लागल्यानंतर शिरा, खीर असे अवतार घडले. सध्या मुलांसाठी, मोठ्यांसाठी प्रोटीन ड्रिंकची चलती आहे. यात मुख्यतः वेगवेगळ्या धान्यांचं चूर्ण असतं. (तीनेक हजार वर्षांपूर्वीच्या महाभारतात अश्वत्थाम्याला पाण्यात पीठ कालवून दूध म्हणून दिल्याची गोष्ट आहेच.) आपल्या शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी तत्कालीन मानवाने किती सूक्ष्म निरीक्षण आणि चातुर्य पणाला लावलं असेल! “सिर्फ दो चीजों से बनाइए इतना टेस्टी नाश्ता” अशा व्हिडिओंचा आजकाल ट्रेण्ड आहे. पण, मानवाने ते पदार्थ हजारो वर्षांपूर्वीच घडवले होते. (उत्तरार्ध)
- मेघना सामंत, (लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)askwhy.meghana@gmail.com