स्ट्रेस, बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव यामुळे भारतात वयाच्या तिशीत किंवा चाळीशीत हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलंय. अशावेळी तज्ज्ञ हार्ट अटॅकच्या समस्येमध्ये 'गोल्डन अवर'ला महत्त्व देतात. 'गोल्डन अवर' म्हणजे नेमकं काय? या पहिल्या एका तासात कुटुंबियांनी काय केलं पाहिजे? हे जाणून घेऊया.
'गोल्डन अवर' म्हणजे काय?
हार्ट अटॅक ची लक्षणं दिसू लागताच पहिला एक तास म्हणजे 'गोल्डन अवर'. हार्ट अटॅक अत्यंत तीव्र असो किंवा माईल्ड (मध्यम) स्वरूपाचा. पहिल्या तासात रुग्णाची परिस्थिती अत्यंत नाजूक आणि गंभीर असते. यावेळेत योग्य उपचार मिळाले. तर रुग्णांचा जीव वाचू शकतो. पहिल्या एका तासात रुग्णांवर योग्य उपचार झाले नाहीत. तर, जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता खूप जास्त वाढते. त्यामुळे, लक्षणं दिसू लागल्यानंतर तात्काळ रुग्णालयात जावं, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात.
का महत्त्वाचा आहे 'गोल्डन अवर'?हृदयाच्या रक्तवाहिनीत निर्माण झालेला अडथळा पहिल्या तासातच मोकळा करण्यात आला. तर, हार्ट अटॅक रिव्हर्स करू शकतो. हृदयाला कायमची इजा होण्यापासून थांबवू शकतो. हृदयाच्या रक्तवाहिन्यात अडथळा निर्माण झाला किंवा रक्तप्रवाह ब्लॉक झाला, तर हार्ट अटॅक येतो.
'गोल्डन अवर'मध्ये नातेवाईकांनी काय करावं?हृदयरोगाचा झटका आल्यानंतर सर्वात महत्त्वाची भूमिका कुटुंबातील व्यक्तींची असते. छातीत दुखू लागल्यानंतर नातेवाईकांनी क्षणाचाही वेळ घालवू नये. तातडीने जवळच्या रुग्णालयात पोहोचून ECG काढावा. छातीत दुखण्याला अॅसिडीटी समजून घरच्या-घरी उपचार करू नयेत.
'गोल्डन अवर'मध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हार्ट अटॅकची लक्षणं ओळखणं
- श्वास घेण्यास त्रास
- खूप थकवा येणं
- हृदयाचे ठोके अनियमित किंवा खूप जास्त जोरात होणं
- अचानक खूप वजन कमी होणं
हार्ट अटॅक आल्यानंतर CPR का महत्त्वाचा आहे?हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीचं हृदय अचानक बंद पडतं आणि तो व्यक्ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळतो. अशा व्यक्तीला योग्य वेळी CPR दिल्यास जीव वाचू शकतो. वैद्यकीय भाषेत CPR ला कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन म्हणतात. टीव्ही किंवा सोशल मीडियावर तुम्ही अनेक दृष्य पाहिली असतील. ज्यामध्ये हार्ट अटॅकमुळे अचानक बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीच्या छातीवर दोन्ही हातांच्या मदतीने लोक दबाव देतात. या प्रक्रियेला कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन असं म्हटलं जातं.