व्यसन ओळखायच्या दोन मार्गांबद्दल आपण मागच्या गुरुवारी बोललो होतो. एक असं की जे कुठलं व्यसन आपल्याला असतं त्याबाबतीत आपला टॉलरन्स वाढतो आणि ते सोडायचा प्रयत्न केला की विड्रॉल सिम्पटम्स दिसायला लागतात. विड्रॉल सिम्पटम्सविषयी मी स्वत:चाच एक अनुभव सांगते.
२०१४ साली राष्ट्रपतींच्या हस्ते मुक्तांगणला महत्त्वाचा पुरस्कार मिळणार होता. त्यासाठी आम्ही दिल्लीला गेलो होतो. स्वाभाविकच सुरक्षा व्यवस्था फार कडक होती. सोबत फोन, पर्स असं काही ठेवता येणार नाही, असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळं फोन स्विच ऑफ करून हॉटेलमध्येच ठेवला. जाताना हातात फोन नाही म्हणून अस्वस्थ वाटत होतं. सुरक्षेच्या कारणामुळं खूप आधी जाऊन बसावं लागलं होतं. एरवी आपण लोकांशी थोड्याफार गप्पा मारतो आणि हातात मोबाइल घेऊन सोशल मीडिया किंवा तसंच बघत बसतो. फोटो काढायची वेळ आलीय? तेव्हा वाटलं, अरे, आपल्या फोनवर काढता आले असते. आता यांच्या फोटोंवर अवलंबून राहावं लागणार! सतत चुकचुकल्यासारखं होत होतं. राहायच्या ठिकाणी पोहोचल्या पोहोचल्या मी रूमची किल्ली ताब्यात घेऊन ताबडतोब माझा फोन सुरू केला. फोन, मेसेजेस चेक केले पटापट. नंतर विचार केला आणि वाटलं ‘ही कसली डिपेन्डन्सी आलीय? मी समजावते लोकांना तर मी स्वत:च अडकत चाललेय का?’ - आणि मी अधिक जागरूक झाले.
हे वागणं एक प्रकारे माझे विड्रॉल सिम्पटम्स होते. फोन बघितल्यावर मला हायसं झालं होतं. अॅडिक्शनचं हे वैशिष्ट्य असतं की तुम्ही नकळत त्या गोष्टीवर अवलंबून राहायला सुरुवात करता. ती मिळाली नाही की तुम्हाला त्रास व्हायला लागतो. दारू, ड्रग्ज, तंबाखू यांसारख्या अमली पदार्थांच्या व्यसनात अडकलेल्यांना विशिष्ट गोष्ट मिळाली नाही की प्रचंड त्रास होतो. हात थरथरणं, उलट्या, भास, फिट्स असं काहीही. अनेकदा त्यांना व्यसन थांबवायचं असतं; पण असे विड्रॉल सिम्पटम्स सुरू झाले की ते निश्चय विसरतात. त्रासाला घाबरून व्यसन चालू ठेवतात. मोबाइल व इंटरनेट अॅडिक्शनबाबतीत आपण कुठल्याही अमली पदार्थाचं सेवन करत नाही, पण तरी आपलं शरीर आणि मन त्या फोनवर, गॅजेटवर प्रचंड अवलंबून राहायला लागलेलं असतं.
डॉ मुक्ता पुणतांबेकर
संचालक, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणे. puntambekar@hotmail.com