- डॉ. शोभित चावला
इंटरनॅशनल डायबेटिक फाउंडेशनच्या माहितीनुसार, अगदी हल्लीच्या काही दिवसांपर्यंत भारतातील मधुमेहींची संख्या जगात सर्वात जास्त होती. सध्या ६२० लाखांपेक्षा जास्त किंवा वयस्क लोकसंख्येपैकी ७.२% हुन जास्त व्यक्तींना मधुमेह आहे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार, युवक आणि मध्यमवयीन लोकसंख्येमध्ये मधुमेहींचे प्रमाण ६.७% तर मधुमेहपूर्व स्थिती असलेल्यांचे प्रमाण ५.६% आहे. मधुमेह होण्याचे सरासरी वय ४२.५ वर्षे आहे.
अमेरिकन डायबिटीस असोसिएशनच्या एका संशोधनानुसार, २०३० सालापर्यंत भारतात मधुमेहींची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढलेली असेल. आनुवंशिक प्रवृत्ती, भारतीय मध्यमवर्गाच्या आहारात कॅलरीजचे वाढलेले प्रमाण आणि बैठी जीवनशैली ही यामागची प्रमुख कारणे आहेत.
मधुमेहामुळे डोळ्यांवर परिणाम होऊन जी स्थिती निर्माण होते त्याला डायबेटिक रेटिनोपॅथी असे म्हणतात. डोळ्याच्या मागील बाजूस प्रकाश-संवेदनशील उतीमधील रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचल्याने असे होते. या भागात रक्ताभिसरण कमी होते, एकदा नुकसान झाल्यावर आणि ब्लॉक झाल्यावर याठिकाणी नवीन रक्तवाहिन्या विकसित होतात. या नव्या रक्तवाहिन्या ठिसूळ असतात आणि काही धक्का लागल्यास किंवा आपोआप देखील त्यामधून रक्तस्त्राव होऊ शकतो. याशिवाय सेंट्रल रेटिनामध्ये द्राव जमा झालेला असतो. या दोन्ही गोष्टी डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकतात.
सुरुवातीला डायबेटिक रेटिनोपॅथीची काहीही लक्षणे दिसून न येण्याची शक्यता असते, फक्त दृष्टी काही प्रमाणात कमी होते. पण जर ही बाब लक्षात आली नाही आणि त्यावर वेळीच उपचार केले गेले नाहीत तर कायमचे अंधत्व येऊ शकते. मधुमेह किती काळापासून आहे आणि रक्तातील साखरेचे प्रमाण किती वरखाली होत आहे त्यानुसार ही समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते.
डायबेटिक रेटिनोपॅथीच्या सुरुवातीच्या टप्प्यात काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. पण ही स्थिती जसजशी वाढत जाते, तसतशी पुढील लक्षणे दिसू लागतात:
> काहीही बघताना मध्येच डाग किंवा गडद तार तरंगू लागते. (फ्लोटर्स)> दृष्टी धूसर होते > अस्थिर दृष्टी > गडद किंवा रिकामे भाग दिसतात. > दृष्टी कमी होते (नंतरच्या टप्प्यात)
डायबेटिक रेटिनोपॅथीचा प्रकार कोणता आहे, तो किती गंभीर आहे, यानुसार त्यावर कोणते उपचार करायचे ते ठरवले जाते आणि त्यामध्ये या समस्येचा वेग कमी करण्यावर किंवा ती वाढणे थांबवण्यावर भर दिला जातो.
समस्या लवकरात लवकर समजून यावी आणि तिच्यावर योग्य ते उपचार केले जावेत यासाठी विविध इमेजिंग मॉडेलिटीज आहेत:
> हाय रेजोल्यूशन रेटिनल इमेजिंग > ओसीटी > वाईड-फील्ड फंडस फ्लुओरेसीन अँजिओग्राफी > ओसीटी-अँजिओग्राफी
या समस्येचे व्यवस्थापन करण्यासाठी:
>> जीवनशैलीमध्ये बदलमधुमेह आणि त्यासोबत उद्भवणाऱ्या स्थितींचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, कोलेस्ट्रॉल आणि लिपिड प्रोफाइलमध्ये बदल झालेला असतो, रक्तदाब नियंत्रणात ठेवला गेला पाहिजे, किडनीचे कार्य नीट सुरु आहे अथवा नाही हे पाहिले गेले पाहिजे. यासाठी संबंधित तज्ञांची मदत घ्यावी. दर सहा महिन्यांतून एकदा संपूर्ण डायबेटिक तपासणी करवून घेणे आणि डायबेटिक तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. रक्तातील साखरेचे मार्कर्स दर तीन महिन्यांमधून एकदा तपासले गेले पाहिजेत. तसेच मधुमेह तज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे रक्तातील साखरेचे प्रमाण घरी तपासले गेले पाहिजे.
>> रेटिनल फोटोकोग्युलेशन या लेजर थेरपीला स्कॅटर लेजर थेरपी असे म्हणतात. असामान्य रक्तवाहिन्या कमी करण्याची क्षमता यामध्ये असते. शस्त्रक्रियेमध्ये स्कॅटर्ड लेजर बर्न्सचा वापर मॅक्युलापासून दूर असलेल्या रेटिनल भागांवर उपचार करण्यासाठी केला जातो. भाजल्यामुळे असामान्य नवीन रक्तवाहिन्या आकसतात.
हे पूर्ण होण्यासाठी दोन किंवा जास्त सेशन्स लागतात. कॉन्टॅक्ट लेन्स आत घालण्याआधी डोळा सुन्न करण्यासाठी थेंब वापरतात. ऑपरेशनमुळे डोळ्यात किरकोळ अस्वस्थता येते, पण कोणत्याही वेदना तोंडावाटे औषधे घेऊन उपचार केले जाऊ शकतात.
>> अँटी-व्हीईजीएफ/नॅनो-इम्प्लांट्सचे इंट्राव्हिट्रियल इंजेक्शन हे डोळ्यात इंजेक्ट केले जातात, नव्या रक्तवाहिन्या निर्माण होण्यास प्रतिबंध घालण्यात आणि द्रव निर्माण होणे कमी होण्यात मदत होते.
हे औषधे इंजेक्ट करण्यासाठी टॉपिकल ऍनेस्थेटिकचा वापर केला जातो. इंजेक्शननंतर २४ तास डोळ्यात जळजळ, पाणी येणे किंवा सूज येणे असे त्रास किंचित स्वरूपात होऊ शकतात. डोळ्यांत संसर्ग आणि ताण जमा होणे असे काही साईड इफेक्ट देखील होऊ शकतात.
फोटोकोग्युलेशनच्या बरोबरीने अधूनमधून हे औषध दिले जाऊ शकते. आणि ही इंजेक्शन्स पुन्हा पुन्हा दिली जावी लागू शकतात.
>> विट्रेक्टोमीया प्रक्रियेमध्ये प्रगत डायबेटिक रेटिनोपॅथीसह डोळ्यात एक छोटी चीर दिली जाते. याचा उद्देश डोळ्यातील रक्त (व्हिट्रियस) तसेच डोळ्यातील पडद्यावर घसरत असलेल्या स्कार टिश्यू काढून टाकणे हा असतो. यासाठी सहसा लोकल ऍनेस्थेशिया वापरला जातो.
दृष्टी कमी होण्यापासून रोखण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे मधुमेहाचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करणे हा आहे. जरी तुमची दृष्टी ठीक असेल तरी, जर तुम्हाला मधुमेह असेल तर दरवर्षी डॉक्टरांकडून डोळे तपासून घ्या.
(लेखक प्रकाश नेत्र केंद्र, लखनौ (एएसजी आय हॉस्पिटल्स) येथे मेडिकल डायरेक्टर आहेत)