Hoarding Disorder : बऱ्याच लोकांना काही जुन्या वस्तू गोळा करण्याची किंवा त्या सांभाळून ठेवण्याची आवड असते. इतकंच नाही तर बरेच लोक घरातील जुन्या अनावश्यक वस्तू तशाच एखाद्या कोपऱ्या सांभाळून ठेवतात. अशा लोकांना पाहून जास्तीत जास्त लोकांना हेच वाटतं की, या लोकांना त्यांच्या वस्तू प्रिय आहेत. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, ही आवड नसून एक मानसिक समस्या आहे. या समस्येला होर्डिंग डिसऑर्डर (Hoarding Disorder) असं म्हटलं जातं.
होर्डिंग डिसऑर्डर असलेल्या व्यक्तींना घरातील जुन्या वस्तू बाहेर फेकल्याने त्रास होतो. मेयो क्लीनिकनुसार, होर्डिंग डिसऑर्डरचा प्रभाव व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर पडतो. ही एक गंभीर समस्या असून याकडे दुर्लक्ष करणं मानसिक आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. आज आम्ही तुम्हाला ही समस्या काय आहे आणि या लक्षणं काय असतात हे सांगणार आहोत.
काय आहे होर्डिंग डिसऑर्डर?
ही एक मानसिक समस्या असून यात लोकांना जुन्या वस्तू गोळा करण्याची सवय असते. कोणत्याही कामात ने येणाऱ्या वस्तू असो वा नव्या वस्तू हे लोक गोळा करून जपून ठेवतात. अशा लोकांना प्राणी पाळण्याचीही आवड असते. एका रिपोर्टनुसार २० पैकी एका व्यक्तीला होर्डिंग डिसऑर्डरची समस्या असते. ५० पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना ही समस्या होण्याचा धोका अधिक असतो. ३० वयोगटातील लोकांनाही ही समस्या होऊ शकते.
होर्डिंग डिसऑर्डरची लक्षणं
- घरात प्रमाणापेक्षा जास्त वस्तू ठेवणं. अनावश्यक वस्तू जमा करून ठेवणं. ही समस्या असलेले लोक ऑफिसमध्येही अनावश्यक वस्तू जमा करून ठेवतात.
- जुन्या वस्तू फेकण्यास त्रास होणे
- वस्तूंच्या ढिगाऱ्यात महत्वाच्या वस्तू शोधण्यात अडचण येणे
- कुणाची ना कुणाची आठवण करून देणाऱ्या वस्तूंवर जास्त जीव असणे
- वस्तू इकडे तिकडे पडून राहिल्यावर चिडचिड होणे, वस्तू ठेवण्यासाठी जागा नसेल तर कमी जागेला दोष देणे
होर्डिंग डिसऑर्डरवर उपचार
ही एक अशी मानसिक स्थिती आहे ज्याचा जीवनावर वाईट प्रभाव पडतो. या उपाय सुद्धा आहे. अशी काही लक्षणं दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
होर्डिंग डिसऑर्डरसाठी थेरपी
सीबीटी (CBT) Cognitive Behavioral Therapy ज्या माध्यमातून होर्डिंग डिसऑर्डर असलेल्या लोकांवर उपचार करता येतात. हा या समस्येचा सगळ्यात यशस्वी उपचार मानला जातो. या थेरपीमध्ये डॉक्टर हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात की, लोकांना अनावश्यक वस्तू जमा करण्याची सवय का असते आणि या वस्तू फेकून देणं त्यांच्यासाठी अवघड का असतं?