ब्रिटनमध्ये लासा फिव्हरनं धुमाकूळ घातला आहे. ११ फेब्रुवारीला लासाची लागण झाल्याचं आढळून आलेल्या एक तृतीयांश रुग्णांचा मृत्यू झाला. पश्चिम आफ्रिकेत प्रवास केल्याची पार्श्वभूमी असलेल्यांना लासाची लागण होत आहे. नायजेरियातील एका शहरात हा विषाणू सर्वप्रथम आढळून आला. त्यावरूनच विषाणूला लासा नाव देण्यात आलं.
लासामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण कमी आहे. मात्र काही विशिष्ट गटांसाठी मृत्यूदर अधिक आहे. विशेषत: गर्भवतींना अधिक धोका आहे. युरोपियन आजार प्रतिबंध आणि नियंत्रण केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार, लासाची लागण झालेले ८० टक्के रुग्ण लक्षणविरहित असतात. त्यामुळे त्यांना लगेच उपचार मिळत नाहीत. काही जणांना रुग्णालयात उपचार घेण्याची गरज भासते. पैकी १५ टक्के रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो.
लासा फिव्हर म्हणजे काय? तो कसा पसरतो?लासा फिव्हर पश्चिम आफ्रिकेत आढळून आला. नायजेरियातील लासामध्ये १९६९ साली तो सर्वप्रथम सापडला. दोन नर्सचा मृत्यू झाल्यानंतर या आजाराची नोंद झाली. हा आजार उंदरांमुळे पसरतो. लायबेरिया, गिनिया, नायजेरिया या पश्चिम आफ्रिकेतील देशांमध्ये तो प्रामुख्यानं आढळून येतो.
लासाबाधित उंदरांच्या लघवी किंवा विष्ठेमुळे दूषित झालेल्या खाद्यपदार्थांच्या संपर्कात आल्यावर एखाद्या व्यक्तीला लासाची लागण होऊ शकते. त्यानंतर हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होतो. लासाबाधित व्यक्तीला आलिंगन दिल्यावर, त्याच्यासोबत हात मिळवल्यावर, त्याच्या शेजारी बसल्यावर लागण होत नाही.
लासाची लक्षणं कोणती?लासाची लक्षणं लागण झाल्यावर १ ते ३ आठवड्यांनी दिसून येतात. सौम्य लक्षणांमध्ये ताप, थकवा, अशक्तपणा, डोकेदुखीचा समावेश होतो. तर गंभीर लक्षणांमध्ये रक्तस्राव, श्वासोच्छवासास त्रास, उलट्या, तोंडाला सूज, छातीत, पाठीत, पोटात वेदनांचा समावेश होतो.
लासाची लागण झाल्यानंतर दोन आठवड्यांनी मृत्यूदेखील होऊ शकतो. अनेक अवयव निकामी झाल्यानं रुग्ण दगावू शकतात. लासाची लागण झाल्यानं बहिरेपणा आल्याचे प्रकार समोर आले आहेत. जवळपास एक तृतीयांश लोकांना बहिरेपणा आला आहे. यातील अनेकांना आलेलं बहिरेपणं हे कायमस्वरुपी आहे.