जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत मोबाइलचा समावेश करणे ही फक्त आता औपचारिकता राहिली आहे. एकदा का संयुक्त राष्ट्रांनी यासंदर्भात ठराव केला की, सगळे देश त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची घाई करतील, एवढे आपले जीवन मोबाइलशी तादात्म्य पावले आहे. असे हे जीवनावश्यक उपकरण जरा जरी नजरेच्या आड झाले तरी मोबाइलधारकाचा जीव कासावीस होतो.
काळाजी गरज म्हणा किंवा अगतिकता, मोबाइल आता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. सकापासून रात्रीपर्यंत आपल्यातील प्रत्येक जण असंख्य वेळा असंख्य कारणांसाठी मोबाइल स्क्रीनवर काही ना काही स्क्रोल करत असतो. रोजचे व्यवहार, सोशल कनेक्ट, डिजिटल व्यवहार, कार्यालयीन कामकाज, पैशांची देवाणघेवाण, ज्ञान, मनोरंजन, आध्यात्म, साहित्य या सगळ्यांसाठी आपण सारेच मोबाइलवर विसंबून राहू लागलो आहोत. कोणाचा संपर्क क्रमांक तोंडपाठ असणे हे आजकाल ‘कूल’ कॅटेगरीत मोडते. थोडक्यात काय, आपले सारे विश्व मोबाइलच्या मुठ्ठीत गेले आहे.
असा हा जीव की, प्राण असलेला मोबाइल नजरेपासून लांब झाला किंवा त्यातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स काही कारणास्तव डिसकनेक्ट झाले तर आपला जीव वरखाली होतो. देहाच्या या अवस्थेला नोमोफोबिया असे संबोधले जाते. मानसशास्त्रज्ञांनी मोबाइलधारकांच्या वर्तनाचे विश्लेषण करून शास्त्रीय कसोट्यांवर त्याची चाचणी करून हा शब्द स्थापित केला आहे. मोबाइलपासून किमान दोन तास दूर राहायचे असा दंडक केला आणि तो अंमलात आणण्याची सक्ती केली तर मोबाइलधारक या अवस्थेला पोहोचतात. नोमोफोबिया हा एक मानसिक आजार असून त्यावर ठरावीक असा काही उपचार नाही. साधारणत: मिलेनियल्समध्ये हा आजार आढळून येतो.
लक्षणे काय असतात?1. मोबाइल जवळपास नसल्यास अस्वस्थ वाटणे, श्वासोच्छवास अनियमित होणे, घाम फुटणे, अंग थरथरणे. उपाय काय आहेत?1. नोमोफोबिया हा आजार आपल्याला होऊ नये यासाठी दिवसाचे ठरावीक तास मोबाइलपासून लांब राहण्याचा नियम कटाक्षाने पाळावा.2. शक्य झाल्यास संपूर्ण एक दिवस डिजिटल उपवास करावा. मोबाइलच्या अति आहारी जाणे टाळावे.
- विनय उपासनी, मुख्य उपसंपादक, लोकमत, मुंबई