बहुतेक पालक आपल्या मुलाच्या अनेक तास फोन वापरण्याच्या सवयीमुळे खूप त्रस्त आहेत. आजकाल मुलं पुस्तके वाचण्याऐवजी आणि मैदानी खेळ खेळण्याऐवजी टीव्ही आणि फोनवर व्हिडिओ पाहण्यात वेळ घालवत आहेत. त्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर विपरीत परिणाम होतो. अनेक पालकांना अजूनही मुलांसाठी स्क्रीन टाईम नेमका किती असावा?, मुलांना कोणत्या वयात फोन द्यायचा?, स्क्रीन टाईम कमी करण्याचे फायदे काय आहेत? हे माहीत नाही. याबाबत जाणून घेऊया...
६ वर्षांपर्यंतच्या मुलाने स्क्रीनवर १ ते २ तासांपेक्षा जास्त वेळ घालवू नये. तसेच १८ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांना फोनपासून पूर्णपणे दूर ठेवा. फोन किंवा टीव्ही स्क्रीनचा वापर मुलाच्या मानसिक आरोग्यावर, झोपण्याच्या वेळेवर आणि शारीरिक हालचालींवर नकारात्मक परिणाम करू शकतो.
जास्त वेळ फोन वापरण्याचे तोटे
एका रिसर्चनुसार, जर मुलं जास्त फोन वापरत असतील तर त्यांच्या मेंदूच्या विकासावर विपरित परिणाम होतो, दृष्टी कमकुवत होते, बॉडी पोश्चर बिघडतं आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते. तसेच यामुळे मुलं सोशल इंटरएक्शन्सपासून दूर जातात आणि क्रिएटिव्हीटीही कमी होऊ लागते.
स्क्रीन टाईम कमी करण्याचे फायदे
मुलांचा स्क्रीन टाइम कमी करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण यामुळे लहान मुलांमध्ये वाचनाची आवड वाढेल, मुलं घराबाहेर खेळायला जातील आणि कुटुंबासोबत वेळ घालवतील. तुमचा आणि मुलांचा बॉण्ड देखील आणखी मजबूत होईल.
स्क्रीन टाईम 'असा' करा कमी
तुम्ही तुमच्या मुलाला स्क्रीनपासून दूर ठेवण्यासाठी वेळापत्रक बनवू शकता. उदाहरणार्थ, रात्रीचे जेवण, नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या वेळी फोन अजिबात वापरू देऊ नका. तसेच आधी अभ्यास पूर्ण करायला सांगा. मुलांना कंटाळा आला तर त्यांना फोन देण्याऐवजी त्यांच्यासोबत घरामध्ये सोपे खेळ खेळा. त्यांना गोष्टींची पुस्तकं वाचायला द्या. त्यांना बागेमध्ये खेळायला घेऊन जा. चित्रकला, शिल्पकला, हस्तकला असे छंद असल्यास ते जोपासा.