सातारा : पूर्वी मुलींची खूप कमी वयात लग्न व्हायची आणि त्यामुळे त्या आई देखील लवकर बनायच्या. तेव्हाच्या काळी लवकर संसाराला लागून लवकर आई होणं चांगलं मानलं जायचं. पण आता काळ बदलला तसे विचारही बदलले. आता मुली या स्वत:च्या पायावर उभं राहून, यशस्वी करियर निर्माण करून मगं संसाराची, मुलांची जबाबदारी स्वीकारण्यावर भर देतात. त्यांना पंचवीस वा तिशीच्या वयात आई होणं हे खूप लवकर वाटतं. अनेक तरुणींच्या मते ३० नंतर लग्न करून ३५ च्या वयात आई होणे सध्या योग्य वाटतंय.
जस जसे वय वाढत जाते तस तशी प्रजनन क्षमता कमी होऊ लागते. यामुळे जास्त वयात गरोदर राहिल्याने मिसकॅरेज वा मृत अर्भकाचा जन्म होण्याचा धोका वाढतो. संशोधनानुसार अंड्याच्या गुणवत्ते मध्ये येणाऱ्या कमतरतेमुळे आणि उच्च रक्तदाब किंवा मधुमेह यांसारख्या दीर्घकालीन समस्यांमुळे मिसकॅरेजचा धोका वाढत जातो.
हाय रिस्क प्रसूती टाळायलाच हवी...
गरोदरपणात होणाऱ्या मधुमेहाला जेस्टेशनल डायबिटीज असे म्हणतात. ३५ किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या स्त्रिया जेव्हा आई होऊ पाहतात तेव्हा त्यांच्या शरीरात ही समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो. अशावेळी रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे आणि सतत व्यायाम करणे गरजेचे असते.
बीपी,मधुमेह असेल तर घ्या काळजी...
जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये गरोदरपणात हाय ब्लड प्रेशर अर्थात उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. गर्भावस्थेमध्ये अशा स्त्रियांनी नियमित चेकअप करून बाळाच्या विकासाची आणि वृद्धीची माहिती घेत राहिली पाहिजे. या सोबतच वारंवार आपला रक्तदाबही तपासणं जरुरी आहे.
जर तुम्ही ३५ वयाच्या नंतर आई बनू इच्छीत असाल तर तुमची वेळेअगोदर किवा सिजेरियन डिलिव्हरी होण्याचा धोका वाढतो. प्रीमॅच्युर डिलिव्हरी म्हणजे ज्यात नऊ महिने पूर्ण होण्याआधीच डिलिव्हरी होते. त्यामुळे या गोष्टीचा विचार करूनच ३५ व्या वयात आई व्हायचं की नाही त्याचा निर्णय घ्यावा.- डाॅ. सुधीर कदम, स्त्रीरोग तज्ज्ञ, जिल्हा शासकीय रुग्णालय सातारा.
२० ते ३० या वयोगटात प्रसूती सर्वात योग्य.
स्त्रियांची आई होण्याची क्षमता आणि योग्य वय हे ३० पर्यंतच असते. त्यानंतर कोणती स्त्री आई होऊ इच्छित असेल तर तिच्या वाट्याला या समस्या येऊ शकतात आणि त्यामुळे तिच्या किवा बाळाच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून सुरक्षित बाळंतपण घालवून आई व्हायचं असेल तर योग्य वेळेतच निर्णय घ्या. असा सल्लाही तज्ज्ञ डाॅक्टरांकडून दिला जातोय.