धावपळीच्या युगात अनेकांनी आपल्या शरीराकडे दुर्लक्षच केले आहे. विशेषत: ज्यांचे अधिक काळ बैठे कामे आहे, त्यांना बैठे कामांमुळे पाठदुखी, कंबरदुखी, डोळ्यांचे आजार, आदी विविध आजार जडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बैठे काम असणाऱ्यांनी काही काळ खुर्चीवरून उठून इतरत्र फिरणे गरजेचे आहे.
पाऊण तासापेक्षा जास्त काळ एका ठिकाणी बसून काम नकोच
अधिक बैठे काम असणाऱ्यांनी शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. किमान चार तास बैठे काम झाल्यानंतर खुर्चीवरून उठून इतर ॲक्टिव्हिटी करावी. त्यानंतर काम करावे. काही त्रास होत असेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावेत. - डाॅ. आशिष राठोड
झोप किती तास हवी?
मानवी शरीराला झोप ही अत्यंत महत्त्वाची आहे. वयानुसार झोपेचे प्रमाण हे ठरलेले असते. विशेषत: युवकांनी, काम करणाऱ्या व्यक्तींनी सहा ते आठ तासांच्या मध्ये झोप घ्यावी. नियमित लवकर झोपून लवकर उठल्याचा अधिक लाभ होतो. दुपारी घेतली जाणारी अधिकची झोपही टाळावी. शरीराला आवश्यक प्रमाणातील झोपेसोबतच पौष्टिक अन्नही तितकेच महत्त्वाचे आहे. डॉ. प्रीतेश भक्कड
दोन जेवणातील अंतर किती हवे?
जेवण चांगले पचण्यासाठी चार ते पाच तासांचे अंतर गरजेचे आहे. दोन जेवणातील हे अंतर अधिक जास्त किंवा कमी असू नये. आम्लपित्ताचा त्रास होईल इतक्याही अधिक प्रमाणामध्ये जेवण करू नये. रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान तीन तासांच्या अगाेदर करावे. रात्री उशिरा जेवणे अयोग्य आहे. - डॉ. व्ही. व्ही. पिंगळे
सकाळी उठल्या उठल्या चहापेक्षा ताज्या फळांचा रस घ्या
अधिक प्रमाणात चहाचे सेवन हे मानवी शरीरास घातक आहे. त्यामुळे सकाळी शक्यतो फळे खावीत. फळांचा रस घेताना त्यात अधिक प्रमाणात साखर टाकणे टाळावे. रसामध्ये बर्फ टाकून पिणेही चुकीचे आहे. फळे ही शरीरास लाभदायक असतात. - डॉ. अर्चना भोसले, शल्यचिकित्सक