तुम्हाला गरजेपेक्षा जास्त झोपे येते का? किंवा दिवसाही तुम्ही तुमच्या झोपेवर कंट्रोल करू शकत नाही का? मग या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. कदाचित हे लक्षण 'नार्कोलेप्सी' या आजाराचं असू शकतं. नार्कोलेप्सी हा झोपेशी निगडीत असलेला एक आजार आहे. ज्यामध्ये व्यक्तीला गरजेपेक्षा जास्त झोप येते. हा आजार जडल्यामुळे व्यक्ती कोणत्याही वेळी अचानक झोपू शकतो. अनेकदा तर या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्ती बसल्या बसल्या किंवा हसता हसताच झोपू शकतात. अनेकदा एखाद्या व्यक्तीला खूप झोप आल्यामुळे असा समज होतो की, जास्त थकवा आल्यामुळे किंवा जास्त जेवणं जेवल्याने झोप येत असावी. पण अनेकदा ही कारणं नसून ती नार्कोलेप्सीची लक्षणं असण्याची शक्यता असते. नार्कोलेप्सीला मेडिकल सायन्समध्ये एक न्यूरोलॉजिकल समस्या समजलं जातं. डॉक्टरांचं योग्य मार्गदर्शन आणि योग्यवेळी केलेल्या उपचारांनी या समस्येपासून सुटका करून घेणं सहज शक्य आहे. जाणून घेऊयात नार्कोलेप्सीच्या लक्षणांबाबत आणि त्यावर करण्यात येणाऱ्या उपचारांबाबत...
काय आहे नार्कोलेप्सी
नार्कोलेप्सी एक प्रकारचा झोपेशी संबंधित आजार आहे. या आजाराने त्रस्त व्यक्तींना रात्रभर पूर्ण झोप घेतल्यानंतरही दिवसा झोप येते आणि थकवा जाणवत राहतो. हा आजार असलेल्या व्यक्ती कितीही झोपल्या तरीदेखील त्यांची झोप पूर्ण होत नाही. हा आजार जास्त करून 15 ते 25 वयादरम्यानच्या लोकांना होतो.
नार्कोलेप्सीची लक्षणं -
- नार्कोलेप्सीने ग्रस्त व्यक्तींना सारखी झोप येते.
- 8 ते 9 तास झोप घेतल्यानंतरही या व्यक्तींना झोप न झाल्यासारखं वाटतं.
- जास्त झोप येण्यासोबतच या व्यक्तींना सतत आळस आणि थकवा येतो.
- या व्यक्ती कधीही आणि केव्हाही झोपतात.
- सामान्यतः नार्कोलेप्सीच्या व्यक्ती सकाळी फार उशीरा उठतात.
- नार्कोलेप्सी झालेल्या व्यक्तींना अनेकदा स्लीप पॅरालिसिसची समस्याही होऊ शकते.
नार्कोलेप्सीवर उपचार -
1. झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा निश्चित करा
नार्कोलेप्सी झालेल्या व्यक्तींना आपल्या झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करणं फार गरजेचं आहे. अशा व्यक्तींनी आपल्या झोपण्याच्या वेळेचं अगदी काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. झोपण्याच्या वेळी कोणतीही कामं करणं टाळलं पाहिजे.
2. रिकाम्या वेळी एखादी डुलकी घ्या
दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा 15 ते 20 मिनिटांची झोप घ्या. त्यामुळे थकवा नाहीसा होईल आणि फ्रेश वाटेल.
3. डॉक्टरांचा सल्ला घ्या
नार्कोलेप्सीच्या आजारावर सहज उपचार करणं शक्य आहे. त्यामुळे अशी समस्या झाल्यास किंवा या आजाराची लक्षणं दिसू लागल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, या आजारावर उपचार म्हणून 'मोडाफाइनिल' नावाचं औषध घेण्यात येतं. या औषधाचे अनेक साईटइफेक्टस आहेत त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध घेऊ नये.