लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या काही महिन्यांपासून मुंबई शहरात साथीच्या आजाराची रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यामध्येसुद्धा विशेष करून मलेरिया आणि डेंग्यूच्या आजराचे अधिक प्रमाणात दिसत आहे. या सर्व प्रकाराची राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दखल घेतली आहे. त्यांनी हे आजार पसरू नये यासाठी पालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहून सूचना दिल्या आहेत. त्यांनी या पत्रात मुंबईच्या कोणत्या विभागात किती रुग्ण याचीही माहिती दिली आहे.
पावसाळा संपून ऑक्टोबर हिट सुरू झाली तरी अद्यापही साथीच्या आजराचे रुग्ण मुंबईत काही प्रमाणात सापडत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जी साऊथ (ना. म. जोशी मार्ग), इ (भायखळा), जी नॉर्थ ( दादर) के वेस्ट (अंधेरी पश्चिम), एफ साऊथ (परळ), टी (मुलुंड) , एफ नॉर्थ (माटुंगा पूर्व) या वॉर्डचा समावेश आहे. मलेरिया आणि डेंग्यूसोबत चिकुनगुनिया या आजाराचे काही रुग्ण आढळून आल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
तसेच आरोग्य सेवा आयुक्तांची सही असलेल्या या पत्रात त्यांनी अंधेरी पश्चिम येथील के वेस्ट वॉर्डात या तीनही आजराचे रुग्ण सापडत असून याची कारणे शोधून या वॉर्डाचा अभ्यास होणे आवश्यक असल्याचे सुचविले आहे. तसेच वॉर्डनिहाय, आजारनिहाय, वस्तीनिहाय रुग्णांचे मॅपिंग होणे आवश्यक आहे. रुग्णाच्या आजूबाजूच्या २०० घराचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. डासांच्या उत्पत्ती स्थळांचा शोध घेऊन योग्य त्या अळीनाशकांचा वापर करावा. या काही उपाययोजना सुचविल्या आहेत.
देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. त्यामुळे या शहरात स्थलांतरित व्यक्तींची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथे बाहेरून लागण होण्याबरोबरच येथून इतर जिल्ह्यांमध्येही या आजाराचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यात सध्या सणासुदीचे दिवस असल्याने या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे गरजेचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
डेंग्यूची लक्षणेडेंग्यू हा डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे. एडिस इजिप्ती या प्रजाती डेंग्यू पसरविण्यास कारणीभूत ठरत असतात. या आजारात तापामुळे काही जणांना हाडे आणि स्नायूंत खूप वेदना जाणवत असतात. त्यासोबत डोकेदुखी, मळमळ, अंगावर लाल पुरळ येणे अशी लक्षणे दिसू शकतात.