व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे फुगीर झालेल्या गुंतागुंतीच्या अशा पायावर दिसणाऱ्या रक्तवाहिन्या. हृदयाच्या झडपांच्या कार्यामध्ये बिघाड झाल्याने व्हेरिकोज व्हेन्स निर्माण होतात. यामुळे या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त साठून राहते. लोकांमध्ये व्हेरिकोज व्हेन्स सर्रास आढळत असल्या तरी त्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते आणि रुग्णांना गुंतागुतीला सामोरे जावे लागते. व्हेरिकोज व्हेन्सकडे दुर्लक्ष केले तर दीर्घकाळामध्ये काय परिणाम होऊ शकतात, याविषयी महत्त्वाच्या बाजू पुढे दिल्या आहेत.
1. पायाला सूज
रक्त साचल्याने वाहिन्यांचा आकार वाढू लागल्याने त्यांच्यातील ताण वाढत जातो आणि त्यांच्यातील रक्त आजूबाजूच्या सॉफ्ट टिश्यूंमध्ये झिरपू लागते. यामुळे पायांना सूज व जडपणा येतो. बराच वेळ बसल्यानंतर किंवा उभे राहिल्यानंतर दिवसाअखेरिस अनेकदा सूज येऊ लागते आणि पायाची हालचाल केल्यावर कमी होऊ लागते.
2. पायदुखी
बाधित वाहिन्यांमध्ये रक्त साचून राहिल्याने व्हेरिकोज व्हेन्समुळे पायात वेदना होतात आणि काफ मसलमध्ये क्रॅम्प येतात. पायाची हालचाल केल्यास आणि पायांना हलका मसाज केल्यास तात्पुरता आराम मिळतो.
3. पायांमध्ये अस्वस्थता
पायात अस्वस्थता निर्माण झाल्याने सारखे पाय हलवावे, असे वाटते. व्हेरिकोज व्हेन्स असलेल्या अंदाजे 30% रुग्णांना पायांमध्ये अस्वस्थता जाणवते, विशेषतः रात्री झोपल्यावर ही जाणीव होते.
4. स्पायडर व्हेन
स्पाइड व्हेन्स या लहान, बाधित वाहिन्या असतात आणि त्या निळ्या, जांभळ्या किंवा लाल रेषा, जाळे किंवा शाखा या स्वरूपात दिसतात. या शक्यतो वेदनारहित असतात आणि त्यामुळे आरोग्याचे कोणतेही प्रश्न सहसा निर्माण होत नाहीत. परंतु, स्पायडर व्हेन डोळ्यांना सुखद दिसत नाहीत, आणि काही जणांना त्यापासून सुटका करून घ्यावीशी वाटू शकते.
5. त्वचा जाडसर होणे आणि रंगामध्ये बदल होणे
लाल रक्तपेशी फुगीर झालेल्या व्हेरिकोज व्हेन्समधून त्वचेमध्ये शिरकाव करत असल्याने त्वचेमध्ये हिमोग्लोबिन साचून राहते. यामुळे क्रोनिक सूज येते आणि त्वचेचा रंग बदलतो, त्यावर गडदपणा दिसतो. काही वर्षांनी त्वचा कडक व जाडसर होऊ शकते.
6. स्किन अल्सर्स
व्हेरिकोज व्हेन्स झालेल्या रुग्णांची त्वचा आरोग्यदायी नसते, त्यामुळे त्यांना जखमा किंवा अल्सर होण्याची भीती अधिक असते. हे अल्सर बरे होण्यासाठी बराच वेळ लागतो किंवा ते पूर्णतः बरे होत नाहीत. याचे कारण म्हणजे, वाहिन्यांतील रक्तप्रवाहामध्ये अडथळा आल्याने बाधित त्वचेला होणाऱ्या पोषणांच्या व ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर दुष्परिणाम होतो. अल्सर वेदनादायी असतात आणि त्यांची दीर्घकाळ काळजी घ्यावी लागते.
7. त्वचेला संसर्ग
सर्वसाण त्वचेमध्ये असलेल्या जीवाणूंमुळे पायामध्ये सूज किंवा अल्सर यांचा संसर्ग होऊ शकतो. यामुळे सेल्युलायटिस नावाचा त्रास होतो. पायांमध्ये प्रचंड सूज येऊ शकते, ते लाल होऊ शकतात किंवा आखडू शकतात. औषधोपचार करून संसर्ग नियंत्रित केला नाही तर जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, प्रामुख्याने वयस्कर व्यक्तींना अधिक धोका असतो.
8. सुपरफिशिअल थ्रॉम्बोफ्लेबायटिस
व्हेरिकोज व्हेन्समध्ये रक्त साचून राहत असल्याने, त्यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता अधिक असते.व्हेरिकोज व्हेन्स झालेल्या अंदाजे 5% लोकांना रक्ताच्या गुठळ्या होण्याचा त्रास होऊ शकतो. थ्रॉम्बॉस्ड वाहिन्या अधिक कडक व वेदनादायी बनतात.
9. डीप व्हेन थ्रॉम्बॉयसिस
व्हेरिकोज व्हेन्समध्ये गाठी असलेल्या एक चतुर्थांश रुग्णांमध्ये खोलवरच्या वाहिन्यांमध्येही गाठी निर्माण होऊ शकतात. पायांना सूज येऊ शकते, पाय लाल होऊ शकतात व त्यात वेदना होऊ शकतात. खोलवरच्या वाहिन्यांतील गाठी फुटू शकतात आणि फुप्फुसातील धमन्यांपर्यंत प्रवास करू शकतात. यामुळे पल्मोनरी थ्रॉम्बॉएम्बोलिझम हा जीवनाला घातक त्रास होऊ शकतो. त्यामुळे डीप व्हेन थ्रॉम्बॉयसिस हा गंभीर आजार असून त्यावर तातडीने उपचार करणे गरजेचे असते.
10. रक्तस्राव
या फुगीर झालेल्या व्हेरिकोज व्हेन्समधील रक्तावर प्रचंड दबाव असतो. त्वचेवर थोडंसं जरी कापलं गेलं किंवा धडक बसली तर या वाहिन्यांतून मोठा रक्तस्राव होऊ शकतो. मुकामार लागला तर त्वचेमध्ये रक्त साचून राहू शकते आणि त्यामुळे त्वचा निळसर, जांभळी होऊ शकते.
लेखक - डॉ. संतोष बी. पाटील
कन्सल्टंट न्यूरो अँड व्हस्क्युलर इंटरव्हेन्शनल रेडिऑलॉजिस्ट, द व्हेन सेंटर