- डॉ. अभिजित देशपांडे , इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ॲाफ स्लीप सायन्सेस
रात्री झोपेत स्वप्न पडो ते ठीक, दिवसाढवळ्या पडलेल्या स्वप्नांना दिवास्वप्न म्हणतात. मनोराज्ये आणि दिवास्वप्ने यात फरक आहे. एका तंद्रीत गेल्यावर जेव्हा दृश्ये पाहिल्याचा भास होतो त्याला दिवास्वप्न म्हणता येईल. दिवास्वप्ने आणि रात्रीची स्वप्ने यात ठळक फरक आहे. जसे वय वाढत जाते तसे दिवास्वप्न बघणे कमी होत जाते. नॉर्थ कॅरोलायना विद्यापीठात असलेल्या पिटर डेलानी यांनी त्याची कारण मीमांसा केली आहे. त्यांच्या मते दिवास्वप्न ही भविष्यकाळासंदर्भात असतात. तरुण लोकांना आपण आयुष्यात सर्वशक्तिमान अथवा ‘हीरो’ होण्याची महत्त्वाकांक्षा असते. वय वाढत जाते तशी ही शक्यता धुसर होत जाते आणि दिवा स्वप्नांचे प्रमाण घटते.
रात्रीच्या स्वप्नांचा स्मरणशक्ती ‘बळकट’ होण्याकरिता उपयोग होतो. याउलट दिवास्वप्नांमुळे आपण अगोदर करीत असलेली कृती विसरली जाते. हे विस्मरणाचे प्रमाण दिवा स्वप्न कुठल्यासंदर्भात आहे यावर अवलंबून असते. आपल्या मेंदूमध्ये विचार करणाऱ्या भागांचे दोन प्रकार असतात. काही भाग विश्लेषण (ॲनालिसिस) करतात, तर काही भावनात्मक पद्धतीने विचार करतात. दिवास्वप्नांमध्ये मेंदूचा विश्लेषण (काथ्याकूट) करणारा भाग शिथिल असतो. रात्रीच्या स्वप्नांमध्ये असा काटेकोर शिथिलपणा दिसत नाही. कॉम्प्युटरमध्ये सॉप्टवेअर आणि हार्डवेअर असते, तसेच ‘मन’ आणि ‘मेंदू’ यांचा संबंध आहे. दिवास्वप्ने ही मेंदूच्या रचनेशी जास्त संलग्न असतात. जशी मेंदूची अंतर्गत साखळी बदलते तशी दिवास्वप्नेदेखील बदलतात. बऱ्याच लोकांना दिवास्वप्ने बघणे हे वेळेचा अपव्यय करणारी सवय असे वाटते; पण अनेक कलाकार आणि सृजनशील माणसांसाठी मात्र ते वरदान ठरू शकते.
जे ऑफिसमध्ये काम करतात त्यांना पिवळ्या ‘पोस्ट इट नोट’ माहिती असतीलच. या उपयुक्त गोष्टीचा शोध ‘आर्ट फ्राय’ या माणसाला एका दिवास्वप्नात लागला. दर रविवारी हा ‘फ्राय’ चर्चमध्ये पाद्र्याचे प्रवचन ऐकायला जायचा. प्रार्थना म्हणताना फ्रायच्या पुस्तकातील बुक मार्क सारखे खाली पडायचे. ज्या थ्री एम या कंपनीत फ्राय काम करायचा, त्या कंपनीतील सिल्वर या शास्त्रज्ञाने पटकन निघून जाईल अशा चिकट गोंदाचा शोध लावला होता; पण याचा व्यावहारिक उपयोग लक्षात आला नव्हता. फ्रायच्या दिवा स्वप्नात बुक मार्कऐवजी हा नाजूक गोंद लावलेला कागद आला आणि ‘पोस्ट इट नोटस्’चा जन्म झाला.