- मयूर पठाडेमांसाहारींपैकी अनेकांना प्रश्न असतो, अंडं तर खायचं, पण त्यातील पिवळा बलक खायचा की पांढरा भाग. डॉक्टरही अनेकांना अंडं खायचा सल्ला देतात. थंडीच्या दिवसांत तर सगळ्यांनाच हा सल्ला अवश्य मिळतो. ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’.. असा जाहीरातवजा सल्ला तर आपल्याला तोंडपाठच आहे..अंड्याचं महत्त्व साºयांनाच माहीत आहे. कारण त्यातून अनेक प्रकारचे पोषक द्रव्ये आपल्याला मिळतात. पण मुख्य प्रश्न असतो तो म्हणजे पूर्ण अंडं खावं, अंड्यातला पिवळा बलक खावा कि फक्त पांढरा भाग. अंड्यातल्या पिवळ्या बलकात कोलेस्टेरॉलचं प्रमाण तुलनेनं जास्त असतं हे अनेकांना महीत असल्यामुळे ते थेट तो बलक काढून फेकूनच देतात...पण शास्त्रीय दृष्ट्या नेमका कोणता भाग उपयुक्त?आहारतज्ञांचं म्हणणं आहे, खरंतर संपूर्ण अंडंच उपयुक्त. त्यातही पिवळ्या बलकामध्ये पांढऱ्या भागापेक्षा आपल्या शरीरासाठी उपयुक्त घटक जास्त प्रमाणात आहेत.
अंड्यात व्हिटॅमिन आणि मिनरल्सचा साठा चांगल्या प्रमाणात असतो. त्यात पिवळ्या बलकामध्ये हे सारे घटक पांढऱ्या भागापेक्षा जास्त प्रमाणात असतात. महत्त्वाचं म्हणजे अंड्यामध्ये असलेल्या एकूण कॅल्शिअमचं प्रमाण बलकामध्ये तब्बल ९० टक्के तर आयर्न ९३ टक्के असतं. पण बलकामध्ये कोलेस्टोरॉलही तुलनेनं जास्त प्रमाणात असतात.अंड्याच्या पांढऱ्या भागातही मॅग्नेशिअम आणि प्रोटिनचं प्रमाण भरपूर असतं.अंड्यातील पिवळा बलक प्रोटिन्स, मिनरल्सच्या दृष्टीनं आपल्या शरीरासाठी जास्त उपयुक्त आहे. तरीही कोणाला जास्त काळजी घ्यायची असेल तर ज्यांना हृदयाचा त्रास आहे किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी अंड्याचा पांढरा भाग अधिक हेल्दी आहे.