अनेक लोकांना हे माहीत नसतं की, कोणत्यावेळी फळं खाणे आपल्या शरीरासाठी प्रभावी आणि लाभदायक ठरतं. कोणत्याही वेळी फळं खाल्ल्याने व्यक्तीला पचनाची समस्या, पोटदुखी, अनिद्रा इतकेच नाही तर डायबिटीजसारखी गंभीर समस्याही होऊ शकते. एका रिसर्चमध्ये आढळून आलं की, दिवसातील कोणत्याही विशेष वेळी फळं खाल्ल्याने शरीरावर याचा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचा प्रभाव पडू शकतो.
नुकसानदायकही होऊ शकतात फळं
काही फळं ही सकाळच्या वेळी खाल्ल्याने शरीराला लगेच आणि अतिरीक्त एनर्जी मिळते. तर काही फळं त्याचेवळी खाल्ल्याने शरीराला एनर्जी मिळत नाही. सामान्यपणे फळं खाण्याची योग्य वेळ यासाठी महत्त्वाची आहे. कारण फळांमध्ये कार्बोहायड्रेट असतात. जे सामान्य ग्लूकोजमध्ये बदलून शरीराला ऊर्जा प्रदान करतात. पण हे ग्लूकोज जेव्हा शरीराकडून उपयोगात आणलं जात नाही, तेव्हा ते चरबीच्या रुपात जमा होतं. यामुळे वजन वाढण्यासोबतच इतरही समस्या निर्माण होतात.
सकाळची वेळ फळं खाण्यासाठी योग्य
तज्ज्ञांनुसार, फळं खाण्याची योग्य वेळ ही सकाळची असते. सकाळी रिकाम्यापोटी फळं खाल्ल्याने शरीराची पचनक्रिया फळातील ग्लूकोजचं वेगाने विघटन करतं. त्यामुळे शरीराला फळातील पोषक तत्त्वांचा फायदा होतो. फळांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात, जे शरीराला वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासोबतच शरीरात रक्त वाढवण्यासही मदत करतात. मात्र योग्य वेळीच फळं खाल्ले तर यातील पोषक तत्त्वे शरीराला मिळतात. त्यामुळे फळांमधील पोषक तत्वांचा फायदा घ्यायचा असेल तर सकाळी जास्तीत जास्त फळं खावीत.
हेल्दी स्नॅक्स
तुम्ही सकाळी वेगवेगळ्या फळांना एकत्र करुन स्नॅक्सच्या रुपातही खाऊ शकता. त्यासोबतच सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणादरम्यानच्या वेळेतही तुम्ही फळं खाऊ शकता. सकाळी नाश्त्यावेळी सफरचंद, पपई, कलिंगड किंवा किवी ही फळं खाऊ शकता.
सायंकाळीही होतो फायदा
सकाळ सोबतच दोन जेवणांच्या मधल्या वेळेतही फळं खाणं चांगलं मानलं जातं. कारण दोन जेवणांच्या मधल्या काळात पोट रिकामं असतं. अशावेळी पोटात वेगवेगळ्या प्रकारचे एंजाइम रिलीज होतात. याने पचनक्रियेला गती मिळते आणि फळांमध्ये असलेलं ग्लूकोज सहजपणे पचतं. तसेच शरीराला फायबर, मिनरल्स आणि इतरही पोषक तत्व मिळतात. तसेच सायंकाळीही फळं खाणं महत्त्वाचं ठरतं.
वजन नियंत्रणात राहतं
दोन जेवणांच्या मधल्या वेळेत फळं खाणं यासाठीही चांगलं असतं, कारण याने व्यक्तीची भूक संपत नाही. तसेच फळं सहजपणे लवकर पचतात. या वेळेत फळं खाल्ल्याने व्यक्तीचं वजनही नियंत्रित राहतं आणि जाडेपणाची समस्याही होत नाही.