कोरोना विषाणूच्या संसर्गाची (Coronavirus Infection) चाचणी कारण्यासाठी आरटी-पीसीआर (RTPCR) म्हणजेच रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन-पॉलिमरेझ चेन रिएक्शन चाचणी करून घेण्यास सांगितलं जातं. त्यामुळे अलीकडच्या काळात आरटी-पीसीआर हा शब्द सगळ्यांच्या परिचयाचा झाला आहे; मात्र ही चाचणी फक्त कोविड -19 साठी (Covid-19) नाही, तर झिका (Zika) आणि डेंग्यूसह (Dengue) इतर विविध आजारांचं निदान करण्यासाठीही वापरली जाते.
कोविडचा उद्रेक झाल्यापासून या चाचण्या करणार्या अनेक नवीन प्रयोगशाळा (Labs) सुरू झाल्यामुळे या चाचणीसाठी येणारा खर्च (Cost) आणि अहवाल (Report) मिळण्यासाठीचा वेळही खूपच कमी झाला आहे. कोविडपूर्व काळात देशातल्या फक्त २०० प्रयोगशाळा आरटी-पीसीआर चाचणी करत होत्या. आता जवळपास 3 हजार प्रयोगशाळा ही चाचणी करत आहेत. कोविड-19, झिका, डेंग्यू आणि चिकनगुनिया या रोगांचं निदान करण्यासाठी कोणत्या चाचण्या वापरल्या जातात आणि त्या कशा कार्य करतात याबाबत न्यूज 18 इंग्रजीने वैद्यकीय तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यातून मिळालेली ही माहिती...
आरटी-पीसीआर : रेण्वीय चाचणी (Molecular Test) किंवा आरटी-पीसीआर तंत्रज्ञानांतर्गत, रक्ताच्या नमुन्यांमधून (Blood Samples) किंवा नाक किंवा घशातल्या स्रावातून विषाणू शोधला जातो. नंतर विषाणूच्या जीनोम सिक्वेन्सला (Genome SEquence) शरीराबाहेर वाढण्याची परवानगी दिली जाते. शरीरात अगदी अल्प स्वरूपात असलेला विषाणूचा अंशदेखील या चाचणीमुळे शोधून काढता येतो आणि तेही अगदी अल्प काळात, त्यामुळे हे तंत्रज्ञान सुवर्ण मानक (Gold Standard) मानलं जातं. या चाचणीचा अहवाल अवघ्या २ ते ४ तासांत मिळू शकतो.
कोणत्याही विषाणूचा किंवा रोगकारक (Pathogen) घटकाचा संसर्ग झाल्यानंतर पहिल्या दोन ते तीन दिवसांत कोणतीही लक्षणं निर्माण करण्यासाठी त्यांची संख्या खूप कमी असते. हे विषाणू किंवा रोगकारक घटक प्रत्येक तासाला काही पटीत वाढत असताना लक्षणं निर्माण होण्यासाठी पुरेशी संख्या निर्माण होण्याकरिता त्यांना साधारणपणे ५ ते ७ दिवस लागतात.
'अगदी तातडीने निदान करण्यासाठी विषाणू शोधण्याचं सर्वोत्तम तंत्रज्ञान म्हणजे आरटी-पीसीआर (RT-PCR) चाचणी आहे. याला रेण्वीय चाचणीही म्हणतात. ही चाचणी विश्वासार्ह आणि 2-4 तासांपेक्षा कमी वेळात अहवाल तयार करणारी मानली जाते. झिकासारख्या इतर अनेक विषाणूजन्य आजारांच्या निदानासाठी ही चाचणी लिहून दिली गेली असली, तरी या चाचणीला येणारा खर्च गेल्या एका वर्षात बराच कमी झाला असून, उपलब्धता वाढली आहे,' असं न्यूबर्ग डायग्नोस्टिक्सच्या प्रयोगशाळा सेवा प्रमुख डॉ. अमृता सिंग यांनी म्हटलं आहे.
TrueNat आणि CBNAAT या चाचण्यांमध्येदेखील हेच तंत्रज्ञान वापरलं जातं. या चाचण्यांचा अहवाल तयार होण्यासाठी दीड तासाचा वेळ लागतो; मात्र यासाठीच्या मशीनमध्ये एकाच वेळी फक्त दोन नमुन्यांची चाचणी करणं शक्य असतं. आरटी-पीसीआरसाठीचं मशीन एका फेरीत ४० ते ४०० नमुन्यांवर प्रक्रिया करतं.
पुण्यातल्या मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स या मॉलिक्युलर डायग्नोस्टिक्स फर्मचे संचालक डॉ. गौतम वानखेडे यांच्या मते, 'कोविड-19 हा संसर्गजन्य आहे आणि तो प्राणघातक ठरू शकतो. त्यामुळे त्याचा लवकर शोध घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे कोविड-19 शोधण्यासाठी आरटी-पीसीआर ही श्रेयस्कर पद्धत आहे.'
झिका विषाणू शोधण्यासाठीही आरटी-पीसीआर ही एक श्रेयस्कर पद्धत आहे. झिकाचं सेरोलॉजिकल निदान कठीण असतं. अशा वेळी पीसीआर-आधारित न्यूक्लिक आम्ल शोधणं ही पद्धत सुचवली जाते. अँटीबॉडी चाचण्यादेखील (Antiboy Test) विश्वासार्ह परिणाम देत नाहीत. कारण ते डेंग्यूसारख्या एकाच कुटुंबातल्या इतर विषाणूंबाबत परस्परविरुद्ध प्रतिक्रिया देतात. यापूर्वी चाचण्या महाग असल्याने आणि अनेक प्रयोगशाळा त्या करत नसल्यामुळे यावर मर्यादा होत्या. तथापि, कोविड-19 मुळे आता देशातल्या 3000 प्रयोगशाळा या चाचण्या करत आहेत, असंही डॉ. वानखेडे यांनी सांगितलं. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आरटी-पीसीआरचा वापर चिकनगुनियाचं निदान करण्यासाठीदेखील केला जातो.
रॅपिड अँटिजेन टेस्ट (RAT) :रॅपिड अँटिजेन टेस्ट (आरएटी-RAT) हा शब्दही आता सगळ्यांच्या चांगलाच माहितीचा झाला आहे. यामध्ये मानवनिर्मित किंवा कृत्रिम अँटीबॉडी वापरून मानवी शरीरातल्या ऊतींची चाचणी केली जाते. 'उदाहरणार्थ, तपासणीसाठीच्या नमुन्यात विषाणू आहे की नाही हे पाहण्यासाठी कोविड-19च्या सिंथेटिक अँटीबॉडीचा वापर केला जाईल. या चाचणीसाठी विषाणूंची विशिष्ट संख्या आवश्यक असते. त्यामुळे काही नमुन्यांमध्ये योग्य अहवाल मिळत नाही,' असंही वानखेडे यांनी सांगितलं.
सरकारी नियमानुसार कोविड-19सह (Covid-19) अनेक रोगांसाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट (RAT) नकारात्मक आली, तरी रुग्णाला खात्रीसाठी आरटी-पीसीआर चाचणी करणं आवश्यक असतं; मात्र रॅपिड अँटिजेन टेस्ट (RAT) सकारात्मक आली तर निदानाची खात्री होते. ही चाचणी अगदी जलद होते, याचा निकालही तासाभरात, तर कधी कधी 15 मिनिटांतही मिळू शकतो.
डेंग्यूचा शोध घेण्यासाठी एलिसा (ELISA) चाचणीचा वापर केला जाऊ शकतो. ही एन्झाइम-लिंक्ड इम्युनोसॉर्बेंट चाचणी आहे. ही चाचणी रक्ताच्या नमुन्यातले अँटिजेन आणि अँटीबॉडीज शोधते.
'डेंग्यूमध्ये, NS1 अँटिजेन एलिसा ही चाचणी सर्वमान्य पद्धत आहे. यामध्ये डेंग्यू विषाणूचं NS1 हे नॉन स्ट्रक्चरल प्रोटीन शोधलं जातं. संसर्गादरम्यान हे प्रथिन रक्तामध्ये पसरतं, असं डॉ. अमृता सिंग म्हणाल्या.
अँटीबॉडी चाचण्या :मानवी शरीरात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही रोगकारक घटकांमुळे अँटीबॉडीज (Antibdies) तयार होतात. रक्ताच्या चाचण्यांमध्ये या अँटीबॉडीज आढळल्या तर त्यावरून संसर्ग झालेला असण्याची खात्री होते; मात्र अँटीबॉडीज लगेच तयार होत नाहीत. त्यामुळे या चाचण्या विषाणू संसर्ग शोधण्यासाठी वापरल्या जात नाहीत.
कोविड-19 किंवा डेंग्यूसारख्या काही आजारांमध्ये, जिथं रोगाचा वाढता प्रसार घातक ठरू शकतो, तिथं अँटीबॉडी चाचणीचा काही उपयोग नसतो. अँटीबॉडी चाचण्या निदानाच्या उद्देशाने सुचवल्या जात नाहीत, तर मागोवा घेण्याच्या दृष्टीने केल्या जातात. निदानाच्या बाबतीत याचा क्रमांक शेवटचा लागतो. त्यामुळे रेण्वीय चाचण्या अधिक विश्वासार्ह आणि लोकप्रिय झाल्या असून, या चाचण्या मागे पडल्याचं डॉ. वानखेडे यांनी स्पष्ट केलं.
अँटीबॉडी एलिसा (ELISA) चाचणी डेंग्यू आणि चिकनगुनियासाठी केली जाते; मात्र या चाचणीला निदानासाठी प्राधान्य दिलं जात नाही. कारण आजारपणाच्या ५-७ दिवसांनंतर ती विश्वसनीय परिणाम देऊ शकते. संसर्गाची पुष्टी झाल्यानंतर किंवा लसीकरण मिळाल्यानंतर या चाचण्या फायदेशीर ठरतात