चेन्नई, दि. 12 - ब्रेन टयूमरची जटिल शस्त्रक्रिया करताना रुग्णाला पूर्णपणे बेशुध्द केले जाते. कारण अशा शस्त्रक्रियेच्यावेळी झालेली एखादी छोटीशी चूकही रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. पण चेन्नईच्या एका रुग्णालयात 10 वर्षाच्या मुलीवर ब्रेन टयूमरची शस्त्रक्रिया सुरु असताना ती चक्क काकांचा मोबाईल घेऊन कँडी क्रश हा तिचा आवडता गेम खेळत होती. मेंदूमधील संवेदनशील भागातून डॉक्टर टयूमरचा गोळा काढत असताना ती मुलगी ऑपरेशन टेबलवर बोलत होती. तिची हालचाल सुरु होती. मुलीच्या या कृतीमुळे शस्त्रक्रिया योग्य दिशेने सुरु असल्याचा डॉक्टरांना आत्मविश्वास मिळाला.
पाचव्या इयत्तेत शिकणा-या नंदिनीला अचानक चक्कर येऊ लागल्यामुळे तिला चेन्नईच्या एसआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या वेगवेगळया चाचण्या करण्यात आल्या. त्यावेळी डोक्याच्या स्कॅनिंगमध्ये नंदिनीला ब्रेन टयूमर असल्याचे निष्पन्न झाले. मेंदूचा जो भाग शरीराची डावी बाजू नियंत्रित करतो तिथे हा टयुमर होता. हा टयूमर वाढला तर, मुलीला पॅरालिसिसचा झटका येऊ शकतो किंवा प्राणघातक ठरु शकते असे एसआयएमएस रुग्णालयाचे न्यूरोसर्जन डॉ. रुपेश कुमार यांनी मुलीच्या पालकांना सांगितले.
ब्रेन टयूमरमध्ये क्रॅनियोटोमी ही पारंपारिक शस्त्रक्रियेची पद्धत वापरली जाते. यामध्ये मानवी कवटीतील हाडाचा एक विशिष्ट भाग काढला जातो. त्यानंतर एका विशिष्ट उपकरणाने टयूमर काढण्यासाठी मेंदूवर शस्त्रक्रिया केली जाते. त्यावेळी रुग्ण पूर्णपणे बेशुद्ध असतो. मला नंदिनीचा टयूमर काढण्यासाठी पारंपारिक पद्धतीने शस्त्रक्रिया करायची नव्हती. कारण मेंदूच्या अत्यंत संवेदनशील भागामध्ये हा टयूमर होता. चुकून मेंदूतील एखाद्या चुकीच्या नसला स्पर्श झाला असता तर, नंदिनीची संपूर्ण डावी बाजू निष्क्रीय झाली असती.
त्यामुळे डॉक्टरांनी नंदिनीला जाग ठेऊन शस्त्रक्रिया केली. ब्रेन टयूमरच्या फक्त दोन टक्के रुग्णांवर अशा प्रकारची शस्त्रक्रिया होते. लहान मुलांना बोलत ठेऊन त्यांच्यावर ब्रेन टयूमरची शस्त्रक्रिया केल्याची उदहारणे फार दुर्मिळ आहेत असे एसआयएमएस रुग्णालयाच्या न्यूरोसर्जन विभागाचे संचालक डॉ. सुरेश बापू यांनी सांगितले. ही शस्त्रक्रिया चालू असताना नंदिनीला कुठल्याही वेदना जाणवल्या नाहीत.
सुरुवातीला मुलीचे पालक या शस्त्रक्रियेसाठी तयार नव्हते. पण डॉक्टरांनी मुलींच्या काकाला पटवून दिल्यानंतर त्यांनी आई-वडीलांची समजूत घातली. मुलीचे काका सुद्धा डॉक्टर आहेत. शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांनी नंदिनीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता तिची प्रकृती स्वस्थ असून ती लवकरच भरत नाटयमची प्रॅक्टीस चालू करणार आहे.