बऱ्याच जणांना गाणी ऐकता-ऐकता काम करणं पसंत असते. काहींना तर कार्यालयातही काम करताना गाणी ऐकायला खूप आवडते. गाणी ऐकून काम केल्यानं एकाग्रता वाढते, असे काहींचे म्हणणे आहे. तर ऑफिसमध्ये काम करताना गाणी ऐकल्याने कामावर लक्ष केंद्रीत करण्यास अडचणी निर्माण होतात, असे काहींचे मानणे आहे. या सर्व तर्कवितर्कांच्या पार्श्वभूमीवर कामादरम्यान गाणी ऐकणं मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं खरंच फायदेशीर असतं की हानिकारक?, यामागील गणित आपण जाणून घेऊया.
कार्यालयाच्या ठिकाणी गाणी ऐकण्याच्या सवयीला अनेक जण चांगलं मानतात. यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते, असे काहींचं मत आहे. पण, ऑफिसमध्ये तुम्ही करत असलेले काम कोणत्या प्रकारात मोडते?, ही बाबदेखील तेवढीच महत्त्वाची आहे. कारण यावरही त्यावेळेस गाणी योग्य आहे की अयोग्य? हे अन्य गोष्टींवर अवलंबून असते.यासंदर्भात नेदरलँडमधील Miami Universityमध्ये करण्यात आलेल्या संशोधनादरम्यान महत्त्वपूर्ण गोष्टी समोर आल्या आहेत. निरनिराळ्या प्रकारचे संगीत ऐकणाऱ्या व्यक्ती आणि शांत वातावरणात एकटे राहून काम करणाऱ्या व्यक्तींची तुलना केली असता, दोघांचीही विचार करण्याची क्षमता वेगळी असते.
निव्वळ आनंद मिळेल असे संगीत ऐकणाऱ्या व्यक्ती अधिक क्रिएटिव्ह असतात. या व्यक्तींची विचार करण्याची क्षमता कमालीची वेगळी असते,असे संशोधनकर्त्यांचे म्हणणे आहे. पण, जर व्यक्ती एखाद्या समस्येत असेल अथवा एखाद्या गोष्टीचा निष्कर्ष शोधण्याच्या प्रयत्नात असेल, तर अशा वेळी संगीत ऐकण्याचा कोणताही परिणाम दिसून येत नाही. म्हणजे संगीताचा आपल्यावर शून्य परिणाम असतो, ही बाबदेखील संशोधनात मांडण्यात आली आहे.
''गाणी न ऐकणाऱ्यांपेक्षा गाणी ऐकणाऱ्या व्यक्तींना अधिक चांगल्या कल्पना सूचतात. काम करताना गाणी ऐकणाऱ्या बहुतांश व्यक्ती आपला तणाव दूर करण्यात यशस्वी ठरतात'', असेही संशोधनकर्त्यांना आढळून आले आहे.
जर तुम्ही अजिबातच गाणी ऐकत नसाल तर लवकरच गाणी ऐकण्याची सवय लावून घ्या. फायदा तुमचाच आहे. कारण ताण-तणाव, नकारात्मक गोष्टी, नैराश्य दूर करण्यासाठी, सुखदुःख वाटण्यासाठी खास व्यक्ती जरी जवळ नसली तरी असंख्य सदाबहार गाणी नक्कीच तुम्हाला मदत करतील आणि आपलंसही करतील, यात शंकाच नाही. पण अतिशय महत्त्वाचे काम करताना गाणी ऐकायची की नाहीत?, याचा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे.
तर मग गाणी ऐकत राहा, गुणगुणत राहा...