- डॉ. नितीन पाटणकर; जीवनशैली आरोग्यतज्ज्ञ
पं तप्रधान नरेंद्र मोदी एका नवरात्री दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. ते नवरात्रीत कडक उपास करतात. फक्त पाणी आणि लिंबूपाणी, ते पण मर्यादित वेळा. त्या दौऱ्यात अनेक सभा, जागतिक नेत्यांसोबत भेटी आणि इतर कामांचा प्रचंड ताण असतानादेखील पंतप्रधानांनी आपला उपवास चालू ठेवला होता. ते बघून अनेकांनी नवरात्रीत उपवास सुरू केले. पंतप्रधानांचे उपवास माहीत नसतानादेखील भारतात अनेक लोक नवरात्रात उपवास करीतच होते. त्यांच्या उपवासाच्या बातमीनंतर हे एक फॅड बनले.
इतर उपवासांप्रमाणे विशिष्ट गोष्टी खाऊन उपवास करणे हे सर्वात सोपे आहे. थोडा जास्त कठीण उपवास म्हणजे फक्त फळांवर राहणे. फक्त लिंबूपाणी किंवा फक्त पाणी पिऊन राहणे हा सर्वात कठीण उपवास. सर्वात कठीण उपवास कुणी करू नये?गरोदर स्त्रिया, स्तनपान चालू असेल तर, बारा वर्षांखालील मुलं, सत्तरीच्यावरील व्यक्ती, मधुमेह, हृदयविकार किंवा किडनीचे आजार असलेल्या व्यक्ती, आजारी व्यक्ती, नुकत्याच आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्ती, भरपूर व्यायाम करणाऱ्या किंवा कष्टाची कामं करणाऱ्या व्यक्ती, वरचेवर प्रवास करावा लागत असेल तर तसेच खाण्यासोबत ज्यांना औषधे घ्यायची असतात अशा व्यक्ती.
दुर्गामातेबद्दल श्रद्धा आणि परंपरा यांच्या मिश्रणातून नवरात्रीत उपास केले जातात. कुणी ‘उपवास तब्येतीकरता चांगले’ म्हणून करतात. तब्येतीसाठी उपवास करायचे असतील तर दर आठवड्याला उपवास करणे जास्त चांगले. ती तयारी काही वर्ष केली तर मग सुरुवातीस दोन दिवस मग तीन, असे करीत १० वर्षांनंतर सलग नऊ दिवस उपवास केला तरच उपवासाचे फायदे मिळू शकतात. एरवी तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस कडकडीत उपवास केला तर नंतरच्या दिवसात वजन वाढवण्याकडे शरीराचा कल असतो.
शास्त्र काय सांगते? व्यायाम, उपवास किंवा कुठलेही बदल यांची सुरुवात नेहमी छोट्या प्रमाणात करावी, त्यात हळूहळू वाढ करावी, असे शास्त्र सांगते. सवय नसताना अचानक काही करण्याने अपाय होण्याचीच शक्यता जास्त. अगदी छोटी सुरुवात, हळूहळू वाढ करताना जर काही त्रास जाणवला तर डॉक्टरचा सल्ला घ्यायला हरकत नाही. कुणी सांगेल की, सुरुवातीस त्रास होतो मग सवय होते. यात खोटे काही नाही पण सारासार विवेक बुद्धी वापरून ‘स्वत:साठी कसा उपवास करावा किंवा करावा की न करावा’ हे प्रत्येकाने ठरवायला हवे. एकाला जमले म्हणजे सगळ्यांना जमेल असे नाही.