डॉ. शुभांगी पारकर, ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ
वर्षाचा शेवट ही अशी वेळ आहे, जेव्हा लोक एकत्रितपणे चांगल्या भविष्यासाठी आत्मपरिवर्तन आणि ध्येय गाठण्यासाठी लागणाऱ्या क्रियाकलापांमध्ये व्यस्त असतात. लोक वर्ष संपताना त्यांची अपुरी स्वप्ने, आव्हाने आणि सुधारणेच्या क्षेत्रांवर विचार करतात. नवीन वर्षाची सुरुवात ही आयुष्याची नवीन सुरुवात करण्याची प्रतीकात्मक संधी म्हणून पाहिली जाते.
भूतकाळातील अपयश, चुका किंवा अपूर्ण उद्दिष्टे मागे टाकून नववर्षात पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची संधी म्हणून अनेक लोक एका वर्षापासून दुसऱ्या वर्षीच्या संक्रमणाकडे पाहतात. नवीन वर्ष हे ध्येय निश्चित करण्याच्या प्रक्रियेतील नैसर्गिक मैलाचा दगड आहे. लोक त्यात सवयीने गुंतत जातात. हा काळ नावीन्याचा असतो.
वार्षिक संकल्प करताना लोक उदात्त ध्येये निवडतात. नवीन वर्ष सुरू झाल्यापासून काही महिन्यांत दहा किलो वजन कमी करण्याचा, पंधरा-वीस सिगारेट ओढायची सवय अचानक सोडून द्यावयाचा, आदर्श जीवनसाथी शोधण्याचा किंवा स्वप्नातील नोकरी मिळवण्याची शपथ घेऊ शकतात. यासारख्या मोठ्या संकल्पनेचे शिवधनुष्य पेलताना दोन विशिष्ट प्रकारची आव्हाने समोर उभी राहतात, ती या उद्दिष्टांची तोडफोड करतात. पहिले आव्हान, मोठी झेप घेण्यासाठी तितकीच ठाम इच्छाशक्ती लागते. म्हणून, ते टिकवणे कठीण आहे. दुसरे आव्हान, पण एकदम मोठमोठी पावले उचलली की, अपयशाची भीती आणि नाकारले जाण्याची भीती लोकांना पराभूत करते.
वजन कमी करणे असो, कर्जातून बाहेर पडणे असो, एखादा आवडता छंद जोपासणे असो किंवा इतर काही असो, अनेकांसाठी नवीन वर्षाचे संकल्प करणे, हा उत्सवाचा व आनंदाचा भाग असतो. प्रत्यक्षात नवीन वर्षाचे ९० टक्क्यांपेक्षा जास्त संकल्प काही महिन्यांतच हुकतात. बहुसंख्य लोक सुरुवातीच्या एक ते सहा आठवड्यांच्या आतच संकल्प सोडून देतात आणि यापैकी बऱ्याच संकल्पांची वर्षानुवर्षे पुनरावृत्ती होते. आपण ते का पूर्ण करू शकत नाही, याची काही कारणे जाणून घेऊया.
अतिमहत्त्वाकांक्षी संकल्प किंवा अवास्तव ध्येये ठेवल्याने व्यक्तीस लवकर निराशा येऊ शकते. बरेच लोक संकल्प कसे साध्य करता येतील यासाठी ठोस योजना न बनवता हवेत ठराव करतात. बरेच संकल्प वैयक्तिक प्रेरणेऐवजी बाह्य दबाव किंवा सामाजिक अपेक्षांद्वारे चालविलेल्या ठरावांमध्ये मोडतात. उदाहरणार्थ, वजन कमी करण्याची फॅशन व योग करायचा ट्रेंड. इतरांनी केले म्हणून आपण ठरवल्यास दीर्घकालीन यशासाठी आवश्यक असलेल्या अंतर्गत ड्राइव्हचा अभाव याठिकाणी असू शकतो.
तोच हाेईल विजयी... -काहींना तत्काळ परिणाम हवे असतात. प्रगती वेगात न झाल्यास ते निराश होतात. दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संयम आणि चिकाटी अत्यंत महत्त्वाची आहे. नकारात्मक मानसिकता किंवा आत्मविश्वासाचा अभाव आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या प्रयत्नांना कमकुवत करू शकतो.
संकल्प लहान भागात विभाजित करा. यामुळे प्रगती अधिक साध्य होते. संकल्प म्हणजे काय, तर तुम्ही 'काय करावे' यापेक्षा तुम्हाला काय करायला आवडेल?
स्वतःसाठी खूप हटवादी किंवा खूप चंचल होऊ नका आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आयुष्यातील बदल आणि परिवर्तनाच्या प्रक्रियेचा आनंद घ्या. लक्षात ठेवा, विजेते आणि पराभूत यांचे ध्येय समान आहे; पण जो त्यावर निष्ठा ठेवतो तोच विजयी होतो.