Health Tips: हिवाळ्यात केस तुटण्याची समस्या बहुतेकांना सतावते. तज्ज्ञांच्या मते, थंड हवामानातील कोरडी हवा टाळूमधील सर्व आर्द्रता शोषून घेते. त्यामुळे टाळू कोरडी होऊन केस तुटण्यास सुरुवात होते. थंडीच्या दिवसात गरम पाण्याने आंघोळ करणे खूप सामान्य आहे, जे केसांसाठी चांगले नाही. गरम पाणी थेट डोक्यावर पडल्यास टाळूलाही इजा होते. टाळूमध्ये खाज सुटणे, जळजळ होणे आणि कोंडा यांसारख्या समस्या उद्भवतात.
काय काळजी घ्याल?
आहारात आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक घटकांच्या कमतरतेमुळे केस गळू शकतात. जर तुमचे शरीर हायड्रेटेड नसेल आणि शरीरात पाण्याची कमतरता असेल तर त्यामुळे केस गळतात. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी समृद्ध आहार घ्या. दुबळे मांस, दही, मासे, सोयासारखे प्रथिनेयुक्त अन्न खा. त्यासोबत पुरेसे पाणी प्या. यामुळे केस गळणे कमी होईल.
हिवाळ्यात सतत शॅम्पू वापरू नये. त्यामुळे केसांच्या मुळांना धक्का बसून केसगळती सुरू होते. शिवाय, टाळू कोरडा झाल्याने केस सुदृढ राहत नाही. केस धुणे टाळण्यासाठी ड्राय शॅम्पूचा वापरही टाळावा.
कंडिशनर केस तुटणे कमी करण्यास मदत करते. कंडिशनर नेहमी केसांच्या लांबीवर लावा आणि टाळूमध्ये मसाज करणार नाही याची खात्री करा. कंडिशनर लावल्याने केस मॉइश्चरायझ होतात आणि ते गुळगुळीत आणि चमकदार राहतात. थंडीपासून केसांचे संरक्षण करण्यासाठी हिवाळ्यात केसांना स्कार्फ वा टोपीने झाकून घ्या.
हिवाळ्यात रसायनयुक्त उत्पादनांनी केस, टाळूच्या त्वचेला हानी पोहोचविण्याऐवजी घरगुती पदार्थ वापरून मास्क तयार करावेत. यामुळे केस आणि टाळूची त्वचा अधिक पोषक होण्यास मदत होते. केसांवर मध आणि नारळाच्या दुधाचा मास्क तीस मिनिटांसाठी लावा. त्यानंतर कोमट किंवा थंड पाण्याने केस धुवा. यामुळे हिवाळ्यात केसांच्या कोंडा आणि कोरडेपणाची समस्या दूर होईल आणि केस तुटणेही कमी होईल. या कालावधीत तेलाने मसाज करणे फायदेशीर ठरेल. यामुळे टाळूमध्ये रक्ताभिसरण वाढते. २-३ चमचे ऑलिव्ह ऑइल किंवा बदामाचे तेल गरम करून केसांच्या मुळांना मसाज करा.- डॉ. तेजस्वी दोषी, त्वचारोग तज्ज्ञ