- डॉ. श्रुती पानसे(मेंदू आणि शिक्षण अभ्यासक)‘तू याच रस्त्याने आलास ना तेव्हा तुला इकडून जाणारी एक रिक्षा दिसली का?’ ‘रिक्षा? मला बऱ्याच गाड्या दिसल्या.. त्यात रिक्षा होती का.. आठवत नाही नक्की..’ असं आपण म्हणू. आणि खरंच त्या गाड्यांमध्ये रिक्षा होती की नाही, हे आपल्याला आठवणारही नाही.
मात्र हेही तितकंच खरं आणि योग्य आहे की पंचेंद्रियामार्फत आपल्या मेंदूपर्यंत सतत इतकी माहिती पोहोचत असते, की त्यातलं काय लक्षात ठेवायचं आहे की काय लगेचच पुसून टाकायचं आहे, याचा निर्णय मेंदूने अगदी अर्ध्या सेकंदात घेतलेला असतो. त्यामुळे एक काय, अगदी चार-पाच रिक्षा त्या रस्त्यावरून गेलेल्या असल्या तरी आपल्याला एकही आठवणार नाही. याचं कारण मेंदूला ते त्याक्षणी महत्त्वाचं वाटलेलं नाही.
एखाद्या दुकानात आपण गेलेलो असताना आपल्या शेजारी कोण उभं होतं, हे आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. कारण त्याची तितकीशी गरज नाही. सिनेमात तीन तास शेजारी बसलेल्या माणसाला मध्यंतरात बघितलं तरी त्या एकाचाही चेहरा आठवणार नाही. मात्र एक आहे, दुकानात उभ्या असलेल्या त्या शेजाऱ्याने काही आवश्यक मदत केली असेल तर तो माणूस लक्षात राहतो. सिनेमात शेजारी बसलेल्या माणसाने कॉमेंट्स केल्या असतील तर तोही लक्षात राहू शकतो.
मानवी मनाची ही सहज प्रवृत्ती आहे, की आपल्याला जे महत्त्वाचं वाटत नाही तिथे आपण लक्ष देत नाही. समजा, आपण रोज ठरावीक रस्त्यावरून जातो, त्यातल्या कोणत्याही एका लहानशा रस्त्यावर नेमकी किती दुकानं आहेत, हे आपल्याला माहीत नसतं. अनेक क्रिकेट मॅचेस आपण बघतो. काही अविस्मरणीय खेळ्याही बघितलेल्या असतात, पण त्या सगळ्या लक्षात राहत नाहीत.याचाच अर्थ जे बिनमहत्त्वाचं आहे, त्याक्षणी मेंदूला जे बिन महत्त्वाचं वाटतं त्याचं ओझं विनाकारण मेंदू स्वत:वर घेत नाही. हे खूपच चांगलं आहे.इथे एक मात्र लक्षात घ्यायला हवं की, त्याच रस्त्यावरच्या दुकानांमध्ये पेपर टाकणारे विक्रेते दुकानांची संख्या आणि क्रिकेट विश्लेषक अविस्मरणीय खेळ्या नक्कीच आणि नीट लक्षात ठेवतील; कारण तो त्यांच्या कामाचा आणि म्हणूनच महत्त्वाचा भाग आहे!( shruti.akrodcourses@gmail.com)